सायखेडा–गोकुळसरा पुलाला हिरवा कंदील; दिल्लीपर्यंत पोहोचला ग्रामस्थांचा आवाज
सायखेडा–गोकुळसरा पुलाला हिरवा कंदील; दिल्लीपर्यंत पोहोचला ग्रामस्थांचा आवाज
खासदार अमर काळे यांच्या पाठपुराव्याला यश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सकारात्मक प्रतिसाद
वर्धा HT news india
वर्धा वर्धा गावाच्या विकासासाठी जिद्दीने पाठपुरावा करणारा नेता लाभला, तर विकासाची पहाट उगवायलाच हवी, असे म्हणतात. सायखेडा–गोकुळसरा परिसरात ही विकासाची पहाट आता प्रत्यक्षात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील गोकुळसरा येथील ग्रामस्थांनी खासदार अमर काळे यांची भेट घेऊन कृतज्ञतेने आभार व्यक्त केले.
दिल्लीतील सत्तादालनात गावाचा आवाज पोहोचवून विविध समस्यांवर पाठपुरावा केल्याबद्दल ग्रामस्थांनी खासदारांचे आभार मानले. या वेळी ग्रामस्थांच्या डोळ्यांत समाधानाचे अश्रू तर ओठांवर कृतज्ञतेची भावना दिसून आली.
सायखेडा–गोकुळसरा परिसरात पाणीटंचाई, रस्त्यांची दुर्दशा, वीजपुरवठ्याच्या समस्या तसेच मूलभूत सुविधांचा अभाव अशा अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. या सर्व प्रश्नांबाबत खासदार अमर काळे यांनी संसदेत आवाज उठवत संबंधित विभागांशी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे शासनाचे लक्ष या समस्यांकडे वेधले गेले आहे.
दरम्यान, सायखेडा–गोकुळसरा परिसरातील नागरिकांना वर्षानुवर्षे वर्धा नदी ओलांडताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर वर्धा नदीवरील बहुप्रतिक्षित पुलाच्या बांधकामासाठी खासदार अमर काळे यांनी थेट दिल्ली गाठून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि सीआरएफ निधीतून तातडीने मंजुरी देण्याची मागणी केली.
यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने सायखेडा–गोकुळसरा पुलाच्या कामाला लवकरच गती मिळणार, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. पुलाच्या उभारणीमुळे परिसरातील अनेक गावांचा संपर्क सुकर होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.