अधिकमासानिमित्त अल्लीपूर येथील भाविकांनी घेतला तीर्थदर्शनाचा लाभ

Tue 09-Jun-2026,04:42 AM IST -07:00
Beach Activities

अधिकमासानिमित्त अल्लीपूर येथील भाविकांनी घेतला तीर्थदर्शनाचा लाभ

प्रतिनिधी : सुनील हिंगे, अल्लीपूर

अधिकमासानिमित्त पुण्यप्राप्तीसाठी सर्वत्र धार्मिक उपक्रमांना वेग आला असून दानधर्म व देवदर्शनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या पवित्र महिन्याचे औचित्य साधून अल्लीपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानच्या वतीने गावातील भाविक भक्तांसाठी केळझर येथील श्री सिद्धीविनायक मंदिर तसेच चौकी येथील बृहस्पती मंदिराच्या दर्शनासाठी विशेष तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आले.

या यात्रेत मंदिरात नियमितपणे काकड आरती, भजन, हरिपाठ व इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये सेवा देणारे वारकरी तसेच देवस्थानात अन्नदान करणारे भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दि. ८ जून रोजी यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यात्रेसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्ष तथा माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या हिंगणघाट आगारातून तीन एसटी बस उपलब्ध करून दिल्या.

यावेळी हिंगणघाट आगाराच्या वाहतूक निरीक्षक ममता मॅडम, चालक बाळू क्षीरसागर, वाहक सतीश मांढरे तसेच इतर चालक-वाहक यांच्या उपस्थितीत यात्रेला प्रारंभ झाला. राज्य परिवहन महामंडळाच्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तीर्थाटन योजना’ अंतर्गत अल्लीपूर व परिसरातील भाविकांना देवदर्शन व पर्यटनाचा लाभ मिळाला.

यावेळी वर्धा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्ष सुरेश वाघमारे यांच्या हस्ते चालक व वाहकांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर भाविकांना तीर्थदर्शनासाठी रवाना करण्यात आले.

या प्रसंगी देवस्थान समितीचे बळवंत कापसे, चंद्रभान साखरकर, अशोक कलोडे, सुनील गुळघाणे, विठ्ठल सुरकार-खत्री, दर्शन कलोडे तसेच इतर सेवाधारी मंडळी उपस्थित होती.