समृद्धी पुलाखाली भीषण अपघात; दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

Tue 09-Jun-2026,05:58 AM IST -07:00
Beach Activities

समृद्धी पुलाखाली भीषण अपघात; दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

पुलगाव (प्रतिनिधी : युसूफ पठाण)

पुलगाव-आर्वी मार्गावरील समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली मंगळवारी दुपारी सुमारे २.३० ते ३ वाजण्याच्या दरम्यान दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरूळ-समुद्री अंडरपासजवळ एमएच-४० बीयू-२२७४ क्रमांकाची पल्सर दुचाकी आणि एमएच-३२ एव्ही-८४५५ क्रमांकाची फॅशन प्रो दुचाकी यांच्यात समृद्धी पुलाखाली जोरदार धडक झाली. दोन्ही वाहनांचा वेग अधिक असल्याने अपघात अत्यंत भीषण झाला. धडकेमुळे दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या अपघातात योगेश रामकृष्ण मेश्राम (रा. साळफळ), देवेंद्र त्र्यंबक दरने (रा. दरने टाकळी) आणि गंगाधर पंढरीनाथ दरने (रा. दरने टाकळी) यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पुलगाव पोलीस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पुलगाव पोलीस करीत आहेत.

या भीषण अपघातामुळे साळफळ व दरने टाकळी परिसरावर शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.