अजय दोनोडे तालुका प्रतिनिधी आमगाव (गोदिया)
बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतंर्गत आमगाव व सालेकसा या दोन तालुक्यातील 36 गावांचा पाणीपुरवठा 16 ऑक्टोबरपासून बंद करण्यात आला आहे. या योजनेची देखभाल दुरुस्ती करणार्या कंत्राटदाराचे देयक थकल्याने पाणीपुरवठा बंद झाला आहे. दरम्यान थकीत देयकाचा भरना करुन पाणी पुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केले आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातंर्गत बनगाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. नळजोडणी धारकांकडून मिळणारी पाणीपट्टी तसेच जिप पाणीपुरवठा विभागाकडून मिळणार्या निधीवर देखभाल दुरुस्ती, वीज देयकाचा भरणा आदी कामे केली जातात. मात्र कधी थकीत वीज देयकामुळे वीजपुरवठा खंडित, कधी पाईपलाईनला गळती, कधी देखभाल दुरुस्तीचे कंपनीला पैसे दिले नाही अशा विविध कारणांनी बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अनेकदा बंद राहते. या योजनेला अविरत सुरू ठेवण्यासाठी मोजक्याच लोकांचा आटापीटा असतो. त्यातच या योजनेचे शुद्ध पाणी घेणारे नळजोडणी धारकही पाणीपट्टी देण्याबाबत उदासीन आहेत. त्यामुळे 36 गावांवर पाणीपट्टीचे 1 कोटी 68 लाख 7 हजार 83 रुपये थकीत आहेत. यात आमगाव तालुक्यातील 25 गावांवर एक कोटी 10 लाख 79 हजार 411 रुपये तर सालेकसा तालुक्यातील 4 गावांवर 17 लाख 53 हजार 360 रुपये थकले आहेत. परिणामी योजनेची देखभाल दुरुस्ती करणार्या गोंदिया येथील कंत्राटदाराचे देयक मागील 6 महिन्यापासून थकले आहे. कंत्राटदाराने 12 ऑक्टोबरपासून आपले कर्मचारी काढणार असल्याची लेखी सूचना जिप ग्रामीण पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिली होती. मात्र त्यानंतरही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या 36 गावातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. *चौकट…* मध्ये *पैसे भरुनही नप क्षेत्रातील पाणीपुरवठा बंद* आमगाव नगरपरिषद अंतर्गत येणार्या 8 गावांपैकी 7 गावे या योजनेचे पाणी वापरतात. नगर परिषदेने पाणीपट्टीचे 39 लाख 74 हजार 12 रुपये जिल्हा परिषदकडे जमा केले आहेत. असे असतानाही नगर परिषद अंतर्गत येणार्या गावातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.