शेंदूरजनाघाट मध्ये शांतता समितीची बैठक

सोशल

प्रतिनिधी:रवी वाहणे वरूड (अमरावती)

वरूड(दि.२२) शेंदूरजनाघाट पोलीस स्टेशनच्या वतीने दुर्गा विसर्जनानिमित्ताने ठाणेदार सतीश इंगळे यांच्याकडून रविवार दि. २२ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता पोलीस स्टेशन आवारात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पांडे, शेंदूरजनाघाट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शेंदूरजनाघाट शहरातील शांतता समितीचे समस्त सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, पोलीस स्टेशनचे कर्मचारी, नगरपरिषदेचे कर्मचारी, प्रत्येक गावातील सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, दुर्गा मंडळाचे पदधिकारी या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीला उपस्थितांना मार्गदर्शन करताना मिरवणुकी दरम्यान येणाऱ्या अडचणी व विसर्जनावेळीच्या अडचणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी समजून घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. अप्पर पोलीस अधीक्षक सातव यांनी मार्गदर्शन करते वेळी सांगितले की, आपले सण- उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरे करून शहरात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक नागरिकांचे सहकार्य मोलाचे आहे. शांतता कमिटीच्या सदस्यांनी व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी या मिरवणुकीत सहभागी होऊन आपल्या परिसरातील मंडळातील सदस्यांना मार्गदर्शन करायचे आहे. जेणेकरून युवा व तरुण पिढी आपल्या मार्गदर्शनात आपली संस्कृती विसरणार नाही, असे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधाकर खडसे तर सर्व मान्यवारांचे आभार ठाणेदार सतीश इंगळे यांनी मानले.

CLICK TO SHARE