त्या’जीवांची तहान फक्त दोन थेंब पाण्याची !

अन्य

त्या’जीवांची तहान फक्त दोन थेंब पाण्याची ! जागृकता •उन्हाचा तडाखा; ‘पाणी ठेवा, पक्षी वाचवा’, पक्षीमित्रांचे परिसरवासीयांना आवाहन

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगाव

आमगांव तालुकातील आकाशी, झेप घेरे पाखरा’ असे म्हणताच आकाशात सूर लावणाऱ्या पक्ष्यांच्या अस्तित्वाची जाणीव होते. याच पक्ष्यांना सध्या कडक उन्हाचा फटका बसणे सुरू झाले आहे. उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत असून प्रत्येकाने पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन पक्षीमित्रांच्यावतीने करण्यात आले आहे. उन्हाळ्यात अन्न-पाण्यासाठी पक्ष्यांची होणारी भटकंती थांबविण्यासाठी परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. गत दहा वर्षांमध्ये परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. त्यामुळे पक्ष्यांची संख्या कमी झाली असल्याचे पक्षी मित्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र जेवढे पक्षी आपल्या परिसरात दिसत असतील, त्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठीआणि उन्हाळा सुसह्य करण्यासाठी नागरिकांनी पाण्याची भांडी ठेवावीत, असे आवाहन पक्षीमित्रांच्यावतीने करण्यात येत आहे. पक्ष्यांसाठी घराबाहेर पाणी ठेवा, असे संदेश सोशल मीडियावर फिरू लागतात. परंतु संदेश पाठविणाराच पक्ष्यांसाठी पाणी ठेवत नाही, ही एक शोकांतिकाच असल्याचे पक्षीमित्र सांगत आहेत. सध्यस्थितीत पक्षी कमी होऊ लागले असून प्रत्येकांनी जवाबदारी ओळखून राहत्या घरी, चौकातील मुख्य ठिकाणी तसेच मूळगावीदेखील जमेल त्या ठिकाणी त्यांच्या दाना-पाण्याची सोय करणे गरजेचे असल्याचा सूर पक्षीमित्रांमध्ये उमटत आहे. *पक्ष्यांना मदत करणे कर्तव्यच* पक्षी निसर्ग चक्रातील एक महत्त्वाचा घटक असून त्यांची मदत करणे आपले कर्तव्य आहे. यात महत्त्वाचे म्हणजे यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच परिसरातील नदी, नाल्याचे पात्र कोरडे पडू लागल्याने पक्ष्यांना शाश्वत असे जलसाठे तुरळक आहेत. त्यामुळे पक्ष्यांचीपाण्यासाठीची भटकंती टाळण्यासाठी परिसरवासीयांनी त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. – *चुनीलाल भाडाकर शिक्षक पक्षीमित्र* *मानवतावादी दृष्टिकोनातून मदत करा* सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांमुळे उष्णतेचे प्रमाण चांगलेच वाढल्याने याचाच त्रास पक्ष्यांना होत आहे. दरम्यान त्यांना पाण्यात भिजावे लागते व महत्त्वाचे म्हणजे पिण्यासाठी त्यांना पाण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी मानवतावादी दृष्टिकोनातून घराच्या टेरेसवर, कम्पाउंड वॉलवर पाण्याचे भांडे ठेवणे गरजेचे आहे.

रितेश अग्रवाल, पक्षीमित्र

CLICK TO SHARE