वर्धा जिल्ह्यात 11 एकर क्षेत्रावर बहरले स्ट्रॉबेरीचे पिक

सोशल

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या प्रयत्नाला यश स्ट्रॉबेरीसाठी शेतकऱ्यांना नाविन्यपुर्णतून प्रोत्साहन कात्री येथील महेश पाटील यांची स्ट्रॉबेरी बाजारात पाटील पितापुत्रास यावर्षी मिळेल 60 लाखाचे उत्पन्न

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपुर :

स्ट्रॉबेरी हे अधिक उत्पन्न देणारे आणि ग्राहकांकडून चांगली मागणी असलेले पिक आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन या पिकाखालील क्षेत्र वाढविण्याच्या सुचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केल्या होत्या. या पिकाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना अवगत होण्यासाठी विशेष प्रशिक्षणाचे देखील आयोजन केले होते. या प्रयत्नाला यश आले असून आज जिल्ह्यात पहिल्यांदाच 11 एकरक्षेत्रावर स्ट्रॉबेरीचे पिक बहरले आहे. हिंगणघाट तालुक्यातील कात्री येतील शेतकरी महेश पाटील यांची स्ट्रॉबेरी बाजारात ग्राहकांसाठी उपलब्ध देखील झाली आहे.जिल्ह्यात मागीलवर्षी हिंगणघाट तालुक्यातील कात्री व धोत्रा येथे दोन शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली होती. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या शेतकऱ्यांच्या स्ट्रॉबेरीला भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी कृषि विज्ञान केंद्र तसेच कृषि विभागाचे शास्त्रज्ञ, अधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्ह्यात शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन या पिकाची वाढ करता येईल का? व त्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील, याची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. या सुचनेनंतर स्ट्रॉबेरी या पिकांचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना अवगत करून त्यांना याकडे वळविण्यासाठी गेल्या मार्च महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा घेण्यात आली. शेतकऱ्यांनी पिक पद्धतीमध्ये विविधता आणावी याकरिता जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपुर्ण योजनेतून स्ट्रॉबेरीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर निधी उपलब्ध करून देण्यात आला. जिल्ह्यात स्ट्रॉबेरीची लागवड शक्यता तपासण्यासाठी एक पथदर्शी प्रकल्प कृषि विज्ञान केंद्र सेलसुरा येथे सुरु करण्यात आला असून तेथे एक एकरवर स्ट्रॉबेरीची लागवड देखील करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या पुढाकाराने आज जिल्ह्यात तब्बल 11 एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड झाली आहे. कात्री येथील शेतकरी महेश पाटील यांच्या शेतातील स्ट्रॉबेरीची काढणी सुद्धा सुरु झाली आहे. येत्या महिनाभरात जिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांनी पिकविलेली स्ट्रॉबेरी खायला मिळणार आहे. महाबळेश्वरला पिकणाऱ्या स्ट्रॉबेरीपेक्षाही जिल्ह्यातील स्ट्रॉबेरीचा चांगला गोडवा मागीलवर्षी ग्राहकांनी अनुभवला. यावर्षी जिल्ह्यात स्ट्रॉबेरीचे भरपूर उत्पन्न होणार आहे. शेतकऱ्यांच्या विनंतीवरून स्ट्रॉबेरीच्या विक्रीचे नियोजन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे.*आठ शेतकऱ्यांकडे 11 एकर स्ट्रॉबेरी*हिंगणघाट तालुक्यातील कात्री येथील शेतकरी महेश पाटील यांनी एक एकर, शंकर पाटील यांनी 4 एकर, धोत्रा येथील सचिन पोहाणे यांनी अर्धा एकर, शिरजगाव येथील अतुल गुजरकर यांनी अर्धा एकर, दरणे टाकळी येथील प्रशांत आंबटकर यांनी अर्धा एकर, नांदगाव येथील विश्वेश्वर फुकट व नारायणराव कलोडे यांनी प्रत्येकी एक एकर, देवळी तालुक्यातील भिडी येथील शेतकरी मिलींद भांडतकर यांनी एक एकर असे एकून 11 एकर क्षेत्रावर रब्बी हंगामात स्ट्रॉबेरी लागवड केली आहे.*स्ट्रॉबेरीसारखी पिके बदल घडवतील – राहुल कर्डिले*शेतकऱ्यांनी पारंपारीक पिकांसोबतच नाविन्यपुर्ण पिकांकडे देखील वळावे, असा प्रयत्न आहे. स्ट्रॉबेरी अधिक उत्पन्न देणारे अतिशय चांगले पिक आहे. त्यामुळे या पिकाकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी गेल्या वर्षभरात सातत्याने प्रयत्न केले. शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. नाविन्यपुर्ण योजनेतून प्रोत्साहनाची तरतूद केली. त्याला चांगले यश मिळत आहे. यावर्षी 11 एकरवर लागवड झाली. भविष्यात हे क्षेत्र अधिक वाढणार आहे. शेतकऱ्यांनी देखील स्ट्रॉबेरी लागवडीसाठी पुढे आले पाहिजे. त्यांना आवश्यक सर्व सहकार्य प्रशासनाच्यावतीने उपलब्ध करून दिले जातील, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.5 एकरात मिळेल 60 लाखाचे उत्पन्न*हिंगणघाट तालुक्यातील कात्री येथील शेतकरी महेश पाटील यांनी मागीलवर्षी पहिल्यांदाच एक एकरवर स्ट्रॉबेरीची लागवड केली होती. लागवड तंत्रज्ञान, बाजारतंत्राची अपुरी माहिती असतांना देखील त्यांनी 3 लाख 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी त्यांच्या स्ट्रॉबेरीला भेट दिल्यानंतर त्यांना विक्रीसाठी बाजार उपलब्ध करून दिले. यावर्षी त्यांनी कुटुंबात दोघांच्या नावावर एकून 5 एकर क्षेत्रावर लागवड केली आहे. गेल्या 15 दिवसांपासून त्यांची स्ट्रॉबेरी काढणीला आली आहे. पाच एकरात साधारणपणे 60 ते 70 लाख रुपयांचे हमखास उत्पन्न होणार असल्याचे महेश पाटील यांनी सांगितले.

CLICK TO SHARE