मतदारांवर दबाव किंवा धमकाविण्याचे प्रकार आढळल्यास त्वरीत माहिती द्या

चुनाव

निवडणूक निरीक्षक जाटवराजकीय पक्ष व उमेदवारांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी आता एकूण १५ उमेदवार रिंगणात असून कुठेही मतदारांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दबाव किंवा धमकाविण्याचे प्रकार आढळल्यास त्याची माहिती त्वरीत द्यावी, असे आवाहन सामान्य निवडणूक निरीक्षक लोकेशकुमार जाटव यांनी केले.राजकीय पक्ष व उमेदवारांच्या प्रतिनिधींना निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जाटव बोलत होते. बैठकीला निवडणूक खर्च निरीक्षक हेमंत हिंगोनिया, कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक सुजीत दास, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी व इतर अधिकारी आणि राजकीय पक्षांचे उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी जाटव म्हणाले, जिल्ह्यात किंवा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या ज्या क्षेत्रात मतदारांवर दबाव टाकणे किंवा धमकाविण्याचे प्रकार निदर्शनासl येत असतील, त्याची माहिती त्वरित कळवावी. जेणेकरून अशा क्षेत्रात पोलिसांसह अतिरिक्त मनुष्यबळाचे व्यवस्थापन करता येईल. तसेच धमकाविणा-यांवर कडक कारवाईसुध्दा केली जाईल. निवडणुकीच्या काळात नागरिकांना किंवा अन्य कोणालाही तक्रार करावयाची असल्यास सी-व्हीजील अॅपचा उपयोग करावा. या अॅपवर तक्रार आणि फोटो अपलोड केल्यास १०० मिनिटांमध्ये त्याचे निराकरण करता येते. निवडणुकीच्या संदर्भातील ऑनलाईन परवानगी करीता सुविधा अॅप विकसीत करण्यात आले आहे. उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी सुविधा अॅपचा वापर करावा. ऑफलाईन परवानगीकरीता एक खिडकी योजनासुध्दा उपलब्ध आहे, असे सामान्य निवडणूक निरीक्षक जाटव यांनी सांगितले.तर खर्च निरीक्षक हिंगोनिया म्हणाले, पूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणताही उमेदवार, राजकीय पक्ष किंवा संघटन १० हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रकमेचा खर्च करू शकत नाही. यापेक्षा जास्त खर्च करावयाचा असल्यास ऑनलाईन किंवा धनादेशाद्वारे करता येईल. तसेच उमेदवारांनी आपल्या खर्चाच्या नोंदवह्या अतिशय अचूक भराव्यात. खर्चाच्या नोंदवहीची पडताळणी तीन वेळा करणे आवश्यक असून नोंदवहीत बाब निहाय खर्च रोज नमुद करावा, अशा सूचना हिंगोनिया यांनी दिल्या.सादरीकरण करतांना जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निःष्पक्ष आणि मुक्त वातावरणात पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, उमेदवारांचे सहकार्य आवश्यक आहे. आदर्श आचारसंहितेच्या काळात काय करावे किंवा काय करू नये, यबाबतही त्यांनी माहिती दिली. सोबतच २७ मार्च रोजी अंतिम झालेली मतदार यादी, ८५ वर्षावरील व दिव्यांग मतदारांना गृहमतदानाची सुविधा, टपाली मतदान, निवडणुकीसाठी पोलिस कर्मचाऱ्यांची तैनाती व इतर मनुष्यबळ, जिल्हास्तरावर व विधानसभा मतदारसंघ स्तरावर मिळणा-या परवानग्या, ईव्हीएम व्हीव्हीपॅट सुरक्षा व्यवस्थापन, स्ट्राँग रुम, पेडन्यूज व जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण, उमेदवारांच्या खर्चाचे योग्य व्यवस्थापन आदींबाबत उमेदवारांच्या प्रतिनिधींना अवगत केले.

CLICK TO SHARE