वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई

क्राइम

पाच इंटरसेप्टर वाहनांची भर

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

चंद्रपूर : वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने आरटीओ च्या वायुवेग पथकांकडून आरटीओच्या तपासणी यंत्रणेत पाच इंटरसेप्टर वाहनांची भर पडली आहे. त्यामुळे आता आरटीओंकडे सहा इंटरसेप्टर वाहने झाली आहेत. या वाहनाला लेझर बेस्ड स्पीड गन विथ लेसर कॅमेरा असल्याने बेलगाम धावणाऱ्या वाहनांना लगाम बसणार आहे.जिल्ह्यातील वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच आधुनिक वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन यासोबतच अति वेगाने वाहन चालवणे ही अपघाताची मुख्य कारणे असल्याचे नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे इंटरसेप्टर वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या वाहनामध्ये अद्ययावत व प्रगत सुविधा बसविल्या असल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर त्वरित कारवाई केली जाणार आहे. याबाबत वाहनमालकाला मोबाइलवर संदेशसुद्धा पाठविण्यात येणार आहे. ही वाहने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात फिरणार असल्याने वाहतूक नियम तोडणे चांगलेच महागात पडणार आहे.वेग वाढवताच होणार कॅमेऱ्यामध्ये कैद -इंटरसेप्टर वाहनांमध्ये लेझर बेस्ड स्पीड गन विथ लेसर कॅमेरा बसविण्यात आला आहे. यामुळे वाहन कितीही वेगात असले तरी वाहनाचा वेग व नंबर प्लेटचा फोटो कॅमेऱ्यात कैद होणार आहे. सोबतच या वाहनांमध्ये अल्कोहोल ब्रेथ अॅनालायझर सुद्धा आहे. यामुळे मद्यपी वाहनचालकांविरुद्ध ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह कारवाईला गती येणार आहे. विशेष म्हणजे, याचे प्रिंटेड अहवाल आणि छायाचित्रही मिळणार आहे. सोबतच गुळगुळीत झालेल्या टायरवर कारवाई करण्यासाठी टायर ट्रेंड ग्रेज उपकरणासह काळी काच मोजणारी टिंट मीटर ही उपलब्ध आहे.इंटरसेप्टर वाहनांचे हे आहेत फायदे -इंटरसेप्टर वाहन हे संपूर्ण जिल्ह्यात फिरणार आहेत. त्यामुळे अपघात रोखणे, थकीत कर वसुली, अपघाताचे निरीक्षक या वाहनामध्ये कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होणार आहे. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाईसुद्धा केली जाणार आहे. त्यामुळे अपघाताला आळा बसण्यास मदत होणार आहे.या तालुक्यात फिरणार वाहने -पहिल्या क्रमांकाचे इंटरसेप्टर वाहन चंद्रपूर तालुक्यातील चंद्रपूर शहर, रामनगर, घुग्घुस, दुर्गापूर, पडोली, दुसरे वाहन नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, चिमूर तालुक्यात तिसरे वाहन मूल, बल्लारपूर, सावली, पोंभुर्णा, चौथे इंटरसेप्टर वाहन भद्रावती, वरोरा तालुक्यात तर पाचवे इंटरसेप्टर वाहन राजुरा, गोंडपिपरी, जिवती व कोरपना तालुक्यात फिरणार आहे. प्रत्येक वाहनावर तीन सहायक मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.

CLICK TO SHARE