अधिकारी,कर्मचारी, सुपरवायझर व सहायकांचे प्रशिक्षण
जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ४ जून २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, एम.आय.डी.सी. परिसर, पडोली येथे होणार आहे. निवडणूक प्रक्रियेतील हा अतिशय महत्वाचा आणि शेवटचा टप्पा आहे. कोणतीही चूक झाली तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया पारदर्शकपणे व अचूक करा, अशा सुचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे मतमोजणीकरीता नियुक्त अधिकारी, कर्मचारी, सुपरवायझर, सहायक, सुक्ष्म निरीक्षकांच्या प्रशिक्षण दरम्यान ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, सहायक निवडणूक अधिकारी डॉ. सुहास गाडे (आणि), नितीनकुमार हिंगोले (वणी), विशालकुमार मेश्राम (बल्लारपूर), संजय पवार (चंद्रपूर), रविंद्र माने (राजुरा) आणि शिवनंदा लंगडापुरे (वरोरा) उपस्थित होते.केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच मतमोजणीची प्रक्रिया राबवावी, असे सांगून जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, जलदगतीने मतमोजणी पेक्षा अचूकपणे मतमोजणी करा. संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतमोजणी केंद्रात गोपनीयता व निःस्पक्षता राखणे आवश्यक आहे. कोणताही निष्काळजीपणा होऊ देऊ नका. आपल्याकडून पल्याकडून थोडी जरी चूक झाली तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, याची सर्वांनी जाणीव ठेवावी. त्यामुळे आपले वर्तन हे अत्यंत जबाबदारीचे असावे. सहायक निवडणूक अधिकारी स्तरावर सुद्धा प्रशिक्षणाची माहिती द्यावी. मतमोजणी करतांना उमेदवार, त्यांचे निवडणूक प्रतिनिधी किंवा मतमोजणी प्रतिनिधींना प्रक्रियेबाबत अवगत करा व त्यांना प्रक्रिया दाखवा.नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मतमोजणी केंद्रावर ठरवून दिलेल्या निर्धारित वेळेपेक्षा आधीच पोहचावे. प्रवेशासाठी दिलेले ओळखपत्र सोबत ठेवा. कोणत्याही स्टाफला मोबाईल, कॅमेरा, आयपॅड, लॅपटॉप किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तु मतमोजणी केंद्राच्या आतमध्ये नेण्यास मनाई आहे, याची प्रत्येकाने नोंद घ्यावी. यापूर्वीसुध्दा मतमोजणी प्रकियेत भाग घेतला असला तरी अतिआत्मविश्वास बाळगू नका. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आणखी उजळणी करून घ्यावी. यानंतरचे शेवटचे प्रशिक्षण ३ जून रोजी मतमोजणी केंद्रावर होणार आहे, याचीसुध्दा सर्वांनी नोंद घ्यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.