सार्वजनिक रहदारीला अडथळा,१० हातठेले धारकांवर गुन्हा दाखल

अन्य

प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर

संडे मार्केट परिसरात सक्त कारवाई निर्देश चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे संडे मार्केट येथे रस्त्यावर हातठेले लावून सार्वजनिक रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या १० हातठेले व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन वाहतुकीस कुठल्याही प्रकारे अडथळा निर्माण होऊन नागरीकांच्या मालमत्ता व जीवित हानी होण्याची शक्यता दिसुन आल्यास संडे मार्केट परिसरात सक्त कारवाई करण्याचे निर्देश मनपातर्फे देण्यात आले आहेत. रविवार ७ जानेवारी रोजी मनपा अतिक्रमण पथक पाहणी करत असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,न्यू इंग्लीश स्कुल,आझाद गार्डन येथे मुजफ्फर शेख,असलम खान, इर्शाद शेख,अशपाक शेख,फिरोज कुरेशी,सुनीता तावाडे,बबलु खान,शाहबाज खान,अप्पु पठाण,एजाज परवेज असे १० हातठेलेधारक रस्त्यालगत दुकाने लावुन वाहतुकीस अडथळा निर्माण करतांना दिसुन आले. सदर विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांचे साहीत्य जप्ती केल्यावर सुद्धा काही काळाने पुन्हा तेच विक्रेते त्याच जागी व्यवसाय करतांना आढळून आल्याने त्यांच्यावर कलम २८३ अन्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनपा हद्दीत महात्मा गांधी चौक ते जटपुरा गेट ते गिरनार चौक हे दोन मुख रस्ते असुन दर रविवारी संडे मार्केट निमित्ताने हातगाडी व हातठेले धारक पथविक्रेते हे सार्वजनिक रस्त्यालगत तसेच पादचारी मार्गावर आपले दुकान थाटून व्यवसाय करतात. मात्र यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो व बऱ्याच ठिकाणी ट्रॅफीक जाम झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत असतात. तसेच पथविक्रेत्यांनी रस्त्यावर दुकाने थाटल्याने जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने वाहतुकीस अडथळा न करण्याच्या सक्त सूचना मनपाद्वारे या पथविक्रेत्यांना सातत्याने देण्यात येतात,मात्र त्याकडे दुर्लक्ष करून मुख्य रस्त्यावर दुकान लावण्याची स्पर्धा हे विक्रेते करू लागले आहेत. त्यामुळे अश्या विक्रेत्यांवर आता गुन्हा नोंद करण्याची कायदेशीर कारवाई करण्यात येत असुन यानंतरही रस्त्यावर दुकाने थाटल्यास मोठी कारवाई करण्याचे मनपाचे निर्देश आहेत.

CLICK TO SHARE