राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार:सुधीर मुनगंटीवारांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

अन्य

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

चंद्रपूर : छत्रपती शिवाजीमहाराज आणि त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य हा भारताच्या इतिहासातील एक दैदीप्यमान अध्याय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय ध्येय धोरणे आजही आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहेत.त्यामुळे त्यांच्या जयंती दिनी त्यांच्या प्रति कृतज्ञता अर्पण करणे, हे सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे राज्यातील सर्वांनी ही शिवजयंती अतिशय उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात साजरी करावी, असे आवाहन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.यासंदर्भात, मंत्री मुनगंटीवार यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवले असून प्रत्येक जिल्ह्यात शिवजयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी, सर्वांचा सहभाग घेत साजरी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवजयंती ज्या ठिकाणी साजरी होईल, त्या ठिकाणचा परिसर स्वच्छ सुंदर व आकर्षक ठेवावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्वच्छ करुन घ्यावा. ज्या ठिकाणी जयंती साजरी करण्यात येणार आहे त्याठिकाणी रंग-रंगोटी करुन विद्युत रोषणाई करणे, रांगोळी काढणे, भगवा ध्वज उभारणे आदी व्यवस्था करण्याबाबत कळविले आहे.शिवजयंती उत्सवाच्या आरंभी महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत वाजविण्यात यावे व त्यासाठी पोलीस बँडची व्यवस्था करावी. कार्यक्रमाच्या अगोदर व कार्यक्रमादरम्यान शिववंदना, स्थानिक कलावंतांकडून पोवाडा गायन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातील गीत-गायन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत. शिक्षण विभागा मार्फत विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, शौर्यगीत स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात. यासंदर्भात स्थानिक जिल्हा स्तरावर व्यापक प्रसिध्दी करावी. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांचा यामध्ये सहभाग असावा, अशा सूचना मंत्री मुनगंटीवार यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्थानिक स्तरावर प्रसिद्धी साठी टीजर, शॉर्ट क्लिप, ग्राफिक्स, विविध मान्यवर यांच्या आवाहनाचे छोटे व्हिडिओ असा समाज माध्यमांचा उचित उपयोग करावा. कार्यक्रमाच्या प्रसिद्धी साठी पत्रकार परिषदेचे आयोजन करावे, अशा सूचनाही मुनगंटीवार यांनी केल्या आहेत.

CLICK TO SHARE