जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
बल्लारपूर महासंस्कृती महोत्सव चंद्रपूर : जात्यावरच्या ओव्या,भूपाळी, भारुड, गवळण, मंगळागौर यातून महाराष्ट्राची संस्कृती, मराठी माणसाची दिनचर्या तसेच महाराष्ट्रात साजरे केले जाणारे विविध सणसमारंभ व उत्सवाची झलक गर्जा महाराष्ट्र माझा या कलाविष्कारातून सादर करण्यात आली. या माध्यमातून महाराष्ट्राची परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडले. औचित्य होते बल्लारपूर, महासंस्कृती महोत्सवाचे. स्थानिक कलाकारांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या गर्जा महाराष्ट्र माझा कलाविष्कार तसेच वाघनृत्य, शिवमहिमा, गीत, संगीत आणि नृत्याविष्कार सादर करुन बल्लारपूरकरांची मने जिंकली. बल्लारपूर महासंस्कृती महोत्सव कार्यक्रमात यामुळे उत्तरोत्तर रंगत येत गेली.यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगांवकर, बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी अजय चरडे, तहसीलदार ओमकार ठाकरे, चंदनसिंह चंदेल आदी उपस्थित होते.बल्लारपूर शहराला ६०० वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने सांस्कृतिक कार्य संचालनालय, जिल्हा प्रशासन आणि बल्लारपूर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने, बल्लारपूर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.सर्वप्रथम सतीश कणकम यांनी साकारलेले जय शिवराय वाघनृत्य सादर करण्यात आले. त्यानंतर नवरंग डान्स अकॅडमी मार्फत गणेश जन्म, शिवतांडव, शिव अघोरी नृत्य आदीवर आधारित शिवमहिमा सादर करण्यात आले. तसेच स्पार्क जनविकास फाउंडेशन, चंद्रपूर निर्मित गर्जा महाराष्ट्र माझा या कलाविष्कारातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. नवोदित कलावंताना व्यासपीठ मिळावे या उद्देशातून गर्जा महाराष्ट्र माझा कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. सुमारे १०० कलावंतांच्या या संचामध्ये सहा महिन्याच्या बालकपासून ७० वर्ष वयाचे कलावंत आहेत. या कलाविष्काराचे दिग्दर्शन प्रज्ञा जिवनकर, संकल्पना आनंद आंबेकर तर मार्गदर्शन संजय वैद्य व गोलू बारहाते यांचे लाभले.