अघोरी उपचाराने घेतला तरुणाचा जीव

क्राइम

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

वडिलाने दारूचे व्यसन सोडवण्यासाठी मुलाला बळजबरीने वैधकाकडे नेले. मात्र, वैद्यकाने केलेल्या अघोरी उपचारामुळे काही तासातच तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना नजीकच्या दारोडा या गावात (ता.३)घडली.सचिन बंडू टापरे (३०) असे मृतक तरुणाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या दारोडा या गावात गावठी दारूविक्री ने कळसच गाठला असून आहारी गेलेल्या अनेक तरुणांच्या मृत्यूच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मृतक सचिन टापरे हा सुद्धा अलीकडेच अधून मधून दारू पीत होता. घटनेच्या आदल्या दिवशी मृतकाने गावातीलच एका मित्राच्या लग्नात दारू पिल्याने वडील बंडू टापरे यांना राग अनावर झाल्याने काल मंगळवारी (ता.२)दुपारचे सुमारास मुलगा सचिनला दारू सोडविण्याचे औषध देण्यासाठी बळजबरीने समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव या गावी वैधकाकडे नेण्यात आले. तेथे वैद्यकाने केलेल्या औषधोपचारानंतर सचिनला घरी आणण्यात आले. अघोरी उपचारामुळे सचिन हा घरी रात्रभर हृदयात झटके देत घरीच पडून राहिला. औषध दिल्यानंतर असेच झटके येतात असे वैद्यकाने सांगितल्यामुळे घरच्या मंडळींनी त्याकडे दुर्लक्ष केले. अशातच, सुमारे दहा तासानंतर एका झटक्याने आज सकाळी सचिनला मृत्यूने कवटाळले. शेतकामासह मालवाहू गाडीचा व्यवसाय करणारा अविवाहित मृतक सचिन शांत आणि मनमिळावू स्वभावाचा होता. मात्र, व्यसनी बुडाला नसला तरी तो अधून मधून दारू प्यायचा. मात्र, दारू सोडवण्यासाठी औषध देण्याचा वडिलांनी धरलेला हट्ट सचिनने काल पुरविला. वडिलाने बळजबरी करताच सचिनने ‘चला, मी येतो, माझी समाधी बांधाल’ असे म्हणत वडिलांसमवेत दारू सोडवण्याचे औषध घेण्यासाठी शेडगाव या गावाला गेला आणि अघोरी औषधोपचारामुळेच सचिनचा नाहक जीव गेला. अघोरी औषधोपचार करणाऱ्या वैद्यकावर पोलीस कारवाई करावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

CLICK TO SHARE