विद्युत तारेच्या स्पर्शाने चिमुकली दगावली

क्राइम

तालुका प्रतिनिधी:सुनिल हिंगे अल्लिपुर

गावातील एका पडक्या घरात चिमुकला व चिमुकली खेळत असताना अचानक विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने जबर झटका बसला. यात चिमुकलीचा रुग्णालयात मृत्यू झाला तर चिमुकल्याला उपचारार्थ नागपूरला हलविण्यात आले आहे. ही घटना सोमवारी दुपारी टाकळी (दरणे) येथे उघडकीस आली.खुशी संदीप सावरकर (६) असे मृत चिमुकलीचे नाव असून, ईश्वर नरेंद्र काळे (७) हा जखमी झाला आहे. सोमवारी दोघेही प्रकाश भालेराव यांच्या पडक्या घरात खेळत होते. खेळताना अचानक विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोघेही बराच वेळ घरात पडून राहिले. बऱ्याच वेळानंतर दोघेही दिसले नसल्याने घरच्यांनी शोधाशोध केली असता दोघीही घरात पडल्याचे दिसून आले. लगेच त्यांना अल्लीपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.निकिता दासलवार यांनी प्राथमिक उपचार करुन प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांनाही सेवाग्रामला हलविण्याचा सल्ला दिला. सेवाग्रामला दाखल केल्यानंतर खुशीने येथेच अखेरचा श्वास घेतला. तर ईश्वरला नागपूरला हलविण्यास सांगण्यात आले. त्याला नागपूरला दाखल केले असून, उपचार सुरु आहे. याप्रकरणी अल्लीपूरचे ठाणेदार प्रफुल्ल डाहुले व त्यांच्या चमूने घटनास्थळी पाहणी करुन नोंद घेतली आहे. चिमुकलीच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

CLICK TO SHARE