जामगाव परिसरात बिबट्याचा वावर,वासराची केली शिकार,शेतकऱ्यांमध्ये भीती चे वातावरण

अन्य

प्रतिनिधी:विजय बागडे जामगाव

जलालखेडा:नरखेड तालुक्यातील जामगाव परिसरात अलीकडे बिबट्याचा वावर वाढला आहे.या बिबट्याने शेतातील गोठ्यात बांधलेल्या वासराची शिकार केल्याचे बुधवारी (दि.२२) सकाळी उघड झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. वन विभाग या बिबट्याच्या बंदोबस्ताकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.रमेश मुरोडिया, रा. जामगाव, ता. नरखेड यांची जामगाव शिवारात शेती असून, शेतात गोठा आहे. त्यांनी मंगळवारी (दि. २१) सायंकाळी गाय व वासरू गोठ्यात बांधले होते. बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास त्यांना वासरू मृतावस्थेत आढळून आले. त्यामुळे त्यांनी वन विभागाला सूचना दिली वनपाल एल.टेकाडे व वनरक्षक शिंदे यांनी सकाळी १० वाजताच्या सुमारास घटनास्थळ गाठून पाहणी केली त्या वासराची शिकार बिबट्याने केल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.या वासराची योग्य नुकसान भरपाई देण्याची तसेच बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

उलट वनाधिकाऱ्यांचा सल्ला

चार दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी काही शेतकऱ्यांना नरखेड तालुक्यातील देवग्राम-मदना रोडवर वाघ दिसला. हा वाघ एक दोन दिवसाआड या भागात येत असल्याचे काहींनी सांगितले. याची सूचनाही त्यांनी वन विभागाला दिली होती. मात्र, वन विभागाने काहीच उपाययोजना केल्या नाहीत. आता बिबट्याने वासराची शिकार केली. यावर नागरिकांसह शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असा उलटा सल्ला देऊन वनाधिकारी त्यांची जबाबदारी झटकत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

CLICK TO SHARE