कौशल्य प्रशिक्षणातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास

अन्य

जिल्हाधिकारी विनय गौडा आदिवासी विद्यार्थ्यांच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

चंद्रपूर : शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विकसीत करण्यासाठी तसेच त्यांना कार्यक्षम बनविण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणाची अत्यंत गरज आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर कार्यालयाने एक अनोखा उपक्रम राबविला असून अशा कौशल्य प्रशिक्षणातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास शक्य आहे, असे मत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी व्यक्त केले.बोर्डा येथील शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेत आयोजित उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर जात पडताळणी समितीचे सहआयुक्त विनोद पाटील, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त दशरथ कुळमेथे, तहसीलदार विजय पवार, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विकास राचलेवार चंद्रपूर, दीपक हेडाऊ वर्धा, नितीन ईसोकर नागपूर, उमेश काशीद देवरी, शिक्षणाधिकारी प्राथ. अश्विनी सोनवणे उपस्थित होत्या.विद्यार्थ्यांमध्ये असलेले वेगवेगळे कौशल्य विकसीत करणे, या उद्देशानेच आदिवासी विकास विभागाने उन्हाळी प्रशिक्षण आयोजित केले, असे सांगून जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, हा एक अनोखा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आला आहे. या एक महिन्याच्या कालावधीत आदिवासी विद्यार्थ्यांनी घेतलेले प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिके पाहून अतिशय आनंद झाला. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आणि शक्ती आहे. अशा उपक्रमामुळे त्यांना एक व्यासपीठ मिळाले असून त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात नक्कीच होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.उपवनसरंक्षक श्वेता बोड्डू म्हणाल्या, येथे येऊन आज अतिशय आनंद झाला. रोजगारासाठी कौशल्य आणि प्रशिक्षणाची गरज आहे. केवळ पुस्तकी शिक्षण नाही तर व्यक्तिमत्व विकासासाठी आदिवासी विकास विभागाने हे प्रशिक्षण शिबीर आयोजित केले. तर सहआयुक्त विनोद पाटील म्हणाले, हा एक स्तुत्य उपक्रम असून विद्यार्थ्यांचा खरा विकास हाच आहे. यावेळी नागपूरचे उपआयुक्त दशरथ कुळमेथे यांनीसुध्दा मनोगत व्यक्त केले.

CLICK TO SHARE