शहर प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर खासगी शाळेतील शिक्षकांच्या विविध समस्या आणि मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी खासगी शाळा शिक्षक संघाच्या वतीने शिक्षणाधिकारी कार्यालय जि.प.समोर सोमवार १५ जानेवारी रोजी निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष प्रमोद रेवतकर यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.अनुकंपा प्रकरणात माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून वारंवार त्रुटी दाखविणे, मान्यता प्रकरणे प्रलंबित ठेवणे, मान्यता देण्यासाठी भ्रष्टाचार करणे, अनुकंपा प्रकरणात न्याय न देण्याची संस्थाचालक व शिक्षणाधिकारी यांची भूमिका याकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे रेवतकर यांनी सांगितले. जिल्ह्यात जि.प. खासगी शाळेअंतर्गत अनुकंपाची शेकडो प्रकरणे प्रलंबित आहेत. मात्र, शिक्षणाधिकारी याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अलीकडेच हिवाळी अधिवेशनात खासगी शाळा शिक्षक संघाच्या या मागणीला अनुसरून विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. यानंतरही माध्यमिक शिक्षणाधिकारी दखल घेत नसल्याने भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोलवर रुतल्याचा आरोप रेवतकर यांनी केला आहे. धरणे आंदोलनात खासगी शाळांच्या शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रेवतकर यांनी यावेळी केले. पत्रकार परिषदेला पुरुषोत्तम टोंगे, रवींद्र जेनेकर, किशोर दहेकर, रवींद्र पडवेकर, भाग्यश्री देशमुख आदी उपस्थित होते.