शेतक-यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण व आधार सिडींग करून घ्यावे

अन्य

जिल्हाधिका-यांकडून पी.एम. किसान सन्मान निधी कार्यवाहीचा आढावा

शहर प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर, दि.14 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत लाभ मिळण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण आणि बँक खात्यास आधार संलग्नीकरण (आधार सिडींग) करणे बंधनकारक आहे. त्यामुळे शेतक-यांनी तात्काळ ई-केवायसी आणि आधार सिडींग करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात पी.एम. किसान पोर्टलवर प्रलंबित असलेल्या बाबींची पुर्तता करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील कार्यवाहीचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे, ओरिएंटल विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक अभिषेक अत्रे, विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी प्रतिक कारपेनवार यांच्यासह कंपनीचे प्रतिनिधी तसेच दूरदृष्यप्रणालीद्वारे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, पी.एम. किसान सन्मान निधी अंतर्गत पुढील हप्त्याचा लाभ मिळण्याकरीता संबंधित लाभार्थी शेतक-यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण आणि आधार सिडींग त्वरीत करून घ्यावे. तसेच तहसीलदारांनी संबंधित लाभार्थ्याचा, 1 फेब्रुवारी 2019 पुर्वीचा 7/12 बघून त्वरित निपटारा करावा. जेणेकरून कोणीही सन्मान निधीच्या लाभापासून वंचित राहणार नाही. सोबतच तालुकानिहाय माहिती घेऊन ई-केवायसी आणि आधार सिडींग प्राधान्याने करून घ्यावे. जिल्ह्यात मंडळ स्तरावरील हवामानाचा अंदाज घेणारे सर्व यंत्र सुस्थितीत आहे की नाही, याची पडताळणी करून मान्सूनच्या पुर्वी सदर यंत्र दुरुस्त करून घ्यावे. याबाबत तहसीलदारांनी गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक आणि स्कायमेटच्या प्रतिनिधींची तालुका स्तरावर बैठक घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.जिल्ह्यात प्रधानमंत्री सन्मान निधीकरीता 2 लक्ष 49 हजार 26 शेतकरी पात्र असून यापैकी 2 लक्ष 42 हजार 697 लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहेत. तर 6329 लाभार्थ्यांचे प्रलंबित आहे. तसेच 2 लक्ष 44 हजार 892 लाभार्थी शेतक-यांचे आधार सिडींग पूर्ण झाले आहेत. तर 6765 शेतक-यांचे आधार सिडींग करणे बाकी असून 581 शेतक-यांची पडताळणी प्रलंबित आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली.

CLICK TO SHARE