शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर 4 जून रोजी पडोली एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोडावून येथे मतमोजणी जिल्हाधिका-यांकडून स्ट्राँग रुमसह मतमोजणी व्यवस्थेची पाहणी एकूण मतमोजणी टेबल 101, उपलब्ध कर्मचा-यांची संख्या 379 प्रशासनाकडून युध्दपातळीवर तयारीचंद्रपूर निवडणूक प्रक्रियेमधील अतिशय महत्वाचा समजला जाणारा मतमोजणीचा टप्पा, येत्या मंगळवारी (4 जून) होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाची युध्द पातळीवर तयारी सुरू आहे. मतमोजणी करीता प्रशासन पूर्णपणे सज्ज असून या व्यवस्थेची पाहणी करण्याकरीता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी वखार महामंडळाच्या गोडाऊन येथील स्ट्राँग रुमसह मतमोजणी केंद्राची पाहणी केली व सूचना दिल्या.13- चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल 2024 रोजी पार पडली. जवळपास दीड महिन्यांच्या कालावधीनंतर येत्या 4 जून रोजी पडोली एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोडावून येथे मतमोजणी होणार आहे. या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी मतमोजणी केंद्राला भेट दिली. प्रत्यक्ष मतमोजणीकरीता येथे असलेल्या एकूण टेबलची व्यवस्था, उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधींच्या बसण्याची व्यवस्था, लावण्यात आलेले बॅरेकेटींग, सीसीटीव्ही, विद्युत व्यवस्था, ईव्हीएम असलेल्या स्ट्राँगरूमचा मार्ग, सुरक्षा व्यवस्था, मिडीया सेंटर आदींचा त्यांनी आढावा घेतला. तसेच संबंधितांना सुचनाही केल्या.यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, अजय चरडे, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी सतीश खडसे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मतमोजणीकरीता एकूण टेबल व फे-यांची संख्या : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघासाठी (ईव्हीएम मतमोजणी) प्रत्येकी 14 टेबल याप्रमाणे एकूण 84 टेबल, टपाली मतपत्रिका मोजण्याकरीता 9 टेबल आणि ईटीपीबीएमएस (सर्व्हिस व्होटर मतपत्रिका) मोजण्याकरीता 8 टेबल असे एकूण 101 टेबल राहणार आहेत. तसेच राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या 24 फे-या, चंद्रपूर – 28, बल्लारपूर – 26, वरोरा – 25, वणी – 25, आणि आर्णि मतदारसंघाच्या मतमोजणीच्या 27 फे-या होणार आहेत.नियुक्त कर्मचा-यांची संख्या : प्रत्यक्ष मतमोजणी करीता आणि अतिरिक्त स्टाफ धरून 120 टक्के याप्रमाणे एकूण 379 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यात मतमोजणी पर्यवेक्षकांची संख्या 122, मतमोजणी सहायक 140 आणि सुक्ष्म निरीक्षकांची संख्या 117 आहे. मतमोजणी केंद्रावर नियुक्त सुरक्षा व्यवस्था : मतमोजणी आवाराच्या परिसराच्या सभोवताली 100 मीटर परिघापासून राज्य पोलिस, मतमोजणी आवाराच्या प्रवेशद्वारावर राज्य सशस्त्र पोलिस आणि मतमोजणी कक्षाच्या द्वाराजवळ केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात आहे.मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तुंना प्रतिबंध : मतमोजणी केंद्रात मोबाईल, कॅमेरा, लॅपटॉप, आयपॅड, तसेच कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तु नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनासुध्दा केवळ मिडीया सेंटरमध्येच मोबाईलचा वापर करता येईल. प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात जातांना मोबाईल, कॅमेरा मिडीया सेंटर येथे जमा करावा लागेल.उमेदवार प्रतिनिधींना अत्यावश्यक सुचना : मतमोजणी परिसरात तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था असल्याने प्रत्यक्ष मतमोजणी स्थळी एकदाच प्रवेश दिला जाईल, परिसर सोडल्यास पुन्हा प्रवेश नाकारण्यात येईल. उमेदवार उमेदवारांचे प्रतिनिधींनी आपले मोबाईल इलेक्ट्रॉनिक संयत्रे जमा करणे बंधनकारक राहील.