शेकापूर शाळेला फ्लॅट पॅनल भेट शेकापूर येथे डिजिटल साहित्याचा लोकार्पण सोहळा संपन्न

अब्दुल कदीर बख्श
हिंगणघाट - हिंगणघाट तालुक्यातील जि प प्राथमिक शाळा शेकापूर (बाई) येथे डिजिटल साहित्याचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. बजाज फाउंडेशन वर्धा यांचे तर्फे तीस टक्के रक्कम भरल्यानंतर शाळेला इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल दिले जाते. त्यासाठी शाळेने ती रक्कम समाज सहभागातून भरायला हवी. शेकापूर गावातील सामाजिक कार्यकर्ते व शिक्षणाची जाण असलेले, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी धडपड करणारे, पोलीस पाटील योगेश झाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र खेकारे, सीएससी सेंटरचे संचालक संदीप मेघरे, तंटामुक्ती अध्यक्ष विनोद राऊत, कंत्राटदार चेतन बोबडे, तलाठी नंदकुमार मुळे, कृषी केंद्र संचालक विपिन वरघणे या सात जणांनी पस्तीस हजार रुपये रक्कम जमा करून बजाज संस्थेत भरले व शाळेला 75 इंची फ्लॅट पॅनल मिळवून दिला. त्या साहित्याचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून स्नेहा थुल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून विजया ढगे, देविदास पाटील, कुमुदिनी बोबडे, पुंडलिक तिजारे, सुनील चौधरी हे उपस्थित होते.सदरील कार्यक्रमाचे उदघाटन हे ज्यांच्या सहकार्यामुळे हे साहित्य शाळेला प्राप्त होऊ शकले त्यांच्याच हस्ते करण्यात आले. त्यात संदीप मेघरे यांनी "डिजिटल माध्यमाच्या साह्याने शिक्षण अधिक परिणामकारक आणि रुचकर करता येते" समाजातील शिक्षणाची जाण असलेल्या व्यक्तींचा सहभाग हे या उपक्रमाचे बलस्थान असल्याचे मत व्यक्त केले.तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मालती मेश्राम यांनी केले तर शाळेला साहित्य मिळवून देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार परमेश्वर नरवटे यांनी केला. सूत्रसंचालन दिपाली सावंत यांनी व आभार रामकृष्ण ढबाले यांनी मांडले.