तहसील कार्यालयासमोर माकप चा ठिय्या आंदोलन निराधार योजनेची रक्कम ५ हजार करण्याची मागणी

Thu 08-May-2025,07:49 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली

आरमोरी : संजय गांधी, श्रावणबाळ व इतर निराधारांच्या अर्थसहाय्याची रक्कम मासिक ५ हजार रूपये करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी काॅ. अमोल मारकवार यांच्या नेतृत्वात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आरमोरी येथील तहसील कार्यालयासमोर शेकडो निराधारांसह ठिय्या आंदोलन करण्यात आले.ठिय्या आंदोलनाला मार्गदर्शन करतांना काॅ. अमोल मारकवार म्हणाले की, सरकार भांडलवदारांचे हजारो कोटींचे कर्ज सरसकट माफ करत आहे. मात्र जगणे कठीण झालेल्या निराधारांना मदत करायला तिजोरीत पैसे नसल्याचे कारण देवून टाळाटाळ केली जात असून हे खपवून घेतले जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. निराधार योजनांची रक्कम ५ हजार करण्याची चळवळ संपूर्ण राज्यभरात उभी करून ती विधिमंडळाच्या दारापर्यंत नेण्याचे काम आम्ही करू, असा निर्धार शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी व्यक्त केला.संजय गांधी निराधार योजनेच्या विधवा महिलांना लाडकी बहिन योजनेचा लाभ देण्यात यावा. महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक २०२४ रद्द करण्यात यावा. तालुक्यातील रोजगार हमीच्या मजूरांची मजूरी त्वरीत देण्यात यावी. अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशावर्कर, शालेय स्वयंपाकी, रोजगार सेवक इत्यादी असंघटीत कामगारांना मासिक २६०००/- रूपये वेतन देण्यात यावे व यांना ५०००/- मासिक पेन्शन देण्यात यावे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दिडपट हमीभाव देण्यात यावे व स्वामीनाथन आयोगाची अमलबजावणी करण्यात यावी. प्रत्येक बेघर लोकांना घर बांधकामासाठी ५ लाख रूपये आर्थीक सहाय्यक देण्यात यावे व त्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही त्यांना आबादीतील जागा देण्यात यावी. जबरानजोत शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे. आरमोरी नगर परिषद अंतर्गत रोजगार हमीचे काम सुरू करण्यात यावी. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची हत्तीने नुकसान केलेली आहे त्या शेतकऱ्यांना एकरी रू. ७५०००/- नुकसान भरपाई देण्यात यावी. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे अनुदान देण्यात यावे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५०,०००/- रूपये प्रोत्साहनपर निधी देण्यात यावी. धान बोनस त्वरीत जमा करण्यात यावे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या.आरमोरी शहरात पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा करा. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी या मागण्यांचा यात समावेश होता.यावेळी मारोती गुरुनूले, मनसेच्या विभा बोबाटे, ज्योती सहारे, माकपचे तालुका सचिव काॅ. राजू सातपूते, काॅ. विठ्ठल प्रधान, माणिक कुर्वे, यशवंत नारनवरे, अर्चना मारकवार,माया सिंदी, भगवान राऊत, किसन राऊत, अंजना कुंभलकर, सोनाली आचकुलवार यांच्यासह शेकडो निराधार महिला व वयोवृध्द शेतकरी या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते.