गीताई मंदिर : प्रेरणा आणि ज्ञानाचा संगम — डॉ. गिरीश ठाकरे

नावेद पठाण मुख्य संपादक
वर्धा :यशवंत महाविद्यालय, वर्धा येथील भाषा विभागाच्या वतीने एक प्रेरणादायी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. या सहलीअंतर्गत विद्यार्थ्यांनी कमलनयन बजाज ट्रस्टद्वारा निर्मित गीताई मंदिर, वर्धा येथे शैक्षणिक भेट दिली.
ही सहल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. सहलीच्या आयोजनात कार्यक्रम समन्वयक डॉ. संजय धोटे आणि डॉ. प्रमोद नारायणे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. यावेळी मराठी विभाग प्रमुख डॉ. एन. एच. खोडे, डॉ. दीपक महाजन आणि इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. माधुरी सिडाम उपस्थित होते.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “शैक्षणिक सहली विद्यार्थ्यांना केवळ माहितीच देत नाहीत, तर जीवनमूल्ये आणि प्रेरणाही प्रदान करतात. असा अनुभव विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात मोलाचा ठरतो.”
गीताई मंदिर संकुलात विद्यार्थ्यांचे स्वागत तेथील व्यवस्थापक राजीव अर्जापुरे आणि प्रशासकीय अधिकारी अनिल देशमुख यांनी केले.अर्जापुरे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “गीताई मंदिर हे केवळ उपासनेचे ठिकाण नसून, ते विनोबा भावेंच्या जीवनदर्शनाचे आणि भारतीय संस्कृतीच्या मूल्यांचे सजीव प्रतीक आहे. येथे येणारा प्रत्येक व्यक्ती आत्मचिंतन आणि शांततेचा अनुभव घेतो.”
प्रशासकीय अधिकारी देशमुख यांनी विद्यार्थ्यांना गीताई मंदिराच्या स्थापनेविषयी, उद्देशांविषयी तसेच त्याच्या सामाजिक व सांस्कृतिक योगदानाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “गीताई मंदिर संकुल हे विनोबा भावेंच्या विचारांचे केंद्र असून येथे प्रत्येक स्थळ साधेपणा, सेवा आणि सत्य या जीवनमूल्यांचे मूर्त रूप आहे.”
विद्यार्थ्यांनी या सहलीदरम्यान गीताई मंदिर संकुलातील प्रमुख स्थळांना भेट दिली. त्यात विनोबा दर्शन केंद्र, विनोबा जीवनाची चित्रप्रदर्शनी, जमनालाल बजाज यांचे जीवनकार्य, गांधी विचार परिषद आणि गांधी विचार अध्ययन केंद्र यांचा समावेश होता. तसेच विद्यार्थ्यांनी विश्वशांती स्तूपाचे दर्शन घेऊन तेथील आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेतला.
या शैक्षणिक सहलीचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये गांधी–विनोबा विचारांची जाण, भारतीय संस्कृतीचे आकलन आणि सामाजिक चेतनेचा विकास साधणे हा होता. विद्यार्थ्यांनी ही सहल अत्यंत प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक असल्याचे मत व्यक्त केले.
सहल दरम्यान विद्यार्थ्यांनी कविता, एकपात्री प्रयोग, गाणे आणि मनोगत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमाचे संचालन कु. वैष्णवी गोहणे यांनी केले, तर शेवटी सामूहिक प्रार्थनेनंतर कु. मृणाली कोकाटे यांनी गीताई मंदिर ट्रस्टच्या सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले.सहलीचा समारोप विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागाने आणि गीताई मंदिराच्या पवित्र वातावरणात झाला.
या वेळी प्रा. नीलम ठवसे, डॉ. अभिजीत वाघाडे, प्रा. अमित पोहणकर, प्रा. कल्याणी टेभरे, प्रा. हिमांशु ढोके, प्रा. प्रणाली कापसे, प्रा. प्रशिक थुल, प्रा. रमाकांत चव्हाण, प्रा. आचल चव्हाण, प्रा. नुतन महाजन तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.