शेतशिवारात वाघाचा वावर – नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मुख्य संपादक नावेद पठाण मो.7415152121
वर्धा:कारंजा घाडगे तालुक्यातील खैरी, धोटीवाडा, बोरगाव, काजळी, राहटी, नागझरी, चिखली, जोगा, नादोरा, बांगडापूर आदी गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाघाचा दिवसाढवळ्या वावर दिसून येत असून त्यामुळे शेतकरी, शेतमजूर व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.सध्या खरीप हंगाम सुरू असून शेतात कापूस, सोयाबीन, तूर यासह विविध पिके बहरात आहेत. शेतात कामे करण्यासाठी शेतकरी व मजूर दिवसभर शेतात असतात. मात्र वाघ शेतातील पिकांमध्ये, रस्त्यावर व कधी झाडावर बसून शिकार शोधत असल्याचे दृश्य अनेकांनी पाहिले. त्यामुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरात वाघांचे दर्शन वाढले असून ‘इतके वाघ आले कुठून?’ ही चर्चेची ठिणगी पेटली आहे. दररोज वाघाचे दर्शन घडत असल्याने गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.सामाजिक कार्यकर्ता रोशन वरठी यांनी याबाबत प्रशासनाला इशारा दिला आहे की, वनविभाग व प्रशासनाने तातडीने वाघाला जेरबंद करावे. अन्यथा कारंजा घाडगे तहसील कार्यालयासमोर आंदोलन उभारले जाईल.गावकऱ्यांची मागणी आहे की वनविभागाने त्वरित पावले उचलून या वाघांचा बंदोबस्त करावा, अन्यथा परिस्थिती गंभीर होऊ शकते.