जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास घरपट्टी व पाणीपट्टी कर माफ!

Mon 26-Jan-2026,11:42 PM IST -07:00
Beach Activities

जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास घरपट्टी व पाणीपट्टी कर माफ!

वर्धा जिल्ह्यातील काचनगाव ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक व आदर्श निर्णय

 

वर्धा | तालुका प्रतिनिधी : सुनील हिंगे अल्लीपूर

 

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील काचनगाव ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक व दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेतला आहे. ज्या कुटुंबातील मुलगा किंवा मुलगी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असेल, त्या कुटुंबाची ग्रामपंचायतीकडील घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्यात येणार आहे. या निर्णयाचे सर्वत्र कौतुक व स्वागत होत आहे.

सरपंच नंदाताई गजानन चिंचुलकर यांच्या नेतृत्वाखाली काचनगाव ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळांना नवे बळ मिळणार असून, मराठी शाळांच्या संवर्धनासाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरणार आहे. जिल्हा परिषद शाळांसाठी थेट घरपट्टी व पाणीपट्टी कर माफ करणारी काचनगाव ग्रामपंचायत वर्धा जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, काचनगाव येथे इयत्ता १ ते ७ पर्यंत वर्ग असून सध्या ९५ विद्यार्थ्यांचा पट आहे. शाळेत एकूण ५ शिक्षक कार्यरत आहेत. मागील दोन वर्षांपासून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतिश अंकुशराव कापसे यांच्या पुढाकाराने व ग्रामपंचायतीच्या उत्तम समन्वयातून शाळेला आर्थिक व प्रशासकीय पाठबळ मिळत असून, शाळा नव्याने कात टाकत आहे. आज या शाळेचे नाव जिल्ह्यात गाजत असताना, या निर्णयामुळे शाळेच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

दरवर्षी जून महिन्यात नवीन शैक्षणिक सत्र सुरू होताच शाळा प्रवेशाची लगबग सुरू होते. शहरासह ग्रामीण भागात कॉन्व्हेंट शाळांचे वाढते प्रस्थ लक्षात घेता, मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळा केवळ पटसंख्येच्या अभावामुळे बंद पडू नयेत, यासाठी काचनगाव ग्रामपंचायतीने हा धाडसी व समाजोपयोगी निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश वाढावा व ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था बळकट व्हावी, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.

हा निर्णय चालू शैक्षणिक सत्र संपल्यानंतर, उन्हाळी सुट्टीनंतर सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रापासून लागू होणार आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतिश कापसे यांनी ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत करत, पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश मोठ्या संख्येने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, काचनगाव येथे करावेत, असे आवाहन केले आहे.

या निर्णयामुळे शाळांमध्ये पुन्हा विद्यार्थ्यांची किलबिल सुरू होणार असल्याने शिक्षक, पालक तसेच ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. काचनगाव ग्रामपंचायतीच्या या आदर्श उपक्रमाची राज्यभर चर्चा सुरू असून, गावातील पुरुष, महिला, युवक, युवती व विद्यार्थी वर्गाकडून या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.