१५ वर्षांनंतर बेघर जनकल्याण गृह निर्माण संस्थेची निवडणूक : परिवर्तन पॅनलचे ११ जागांवर वर्चस्व
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : बल्लारपूर शहरातील प्रतिष्ठित बेघर जनकल्याण गृह निर्माण संस्था बल्लारपुर या संस्थेची तब्बल १५ वर्षांनंतर अखेर निवडणूक प्रक्रिया पार पडली. एक वर्षांच्या कार्यकाळासाठी झालेल्या या निवडणुकीकडे संस्थेच्या सदस्यांचे विशेष लक्ष लागले होते.
निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष व सुव्यवस्थित रितीने पार पाडण्यासाठी सहकार विभागाचे प्रशासकीय अधिकारी निलेश पानतावणे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया शांततापूर्ण व पारदर्शक वातावरणात पूर्ण झाली.
या निवडणुकीत दोन पॅनलमध्ये थेट लढत झाली.
चुरशीच्या लढतीनंतर राहुल आमटे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने स्पष्ट बहुमत मिळवत ११ जागांवर विजय संपादन केला. विजयी उमेदवारांमध्ये लोमेश लाडे, प्रेमदास वाघमारे, देवराव नंदेश्वर, जितेंद्र करमनकर, ताराचंद्र रायपुरे, मेघराज कूडे, रामकृष्ण हम्बर्डे, अजय दुपारे, धनंजय रिंगणे, महिला प्रतिनिधी वत्सला तेलंग तसेच प्रा. स्मिता बेताल यांचा समावेश आहे.
निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांचे संस्थेच्या सदस्यांनी पुष्पहार घालून व मिठाई वाटून जल्लोषात स्वागत केले. रत्नाकर सोनटक्के, वामन कांबळे, अशोक चिवंडे, दिलीप मुन, मिलिंद भीमटे, भगवान मस्के, गुणरत्न रामटेके यांच्यासह अन्य मान्यवरांनी विजयी सदस्यांचे अभिनंदन केले. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
निकालानंतर आयोजित सभेत राहुल आमटे व लोमेश लाडे यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेचा विकास, पारदर्शक कारभार आणि सदस्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. संस्थेत राहणाऱ्या सर्व सदस्यांना स्वतंत्र सातबारा मिळवून देण्यासाठी तसेच मोकळ्या मैदानात सभागृह उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. १५ वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीमुळे संस्थेत नवचैतन्य निर्माण झाले असून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडून विकासात्मक कामांची अपेक्षा व्यक्त होत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ताराचंद्र रायपुरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. महेंद्र बेताल यांनी केले. यावेळी संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.