अखेर प्रशासन झुकले मागण्यांच्या पूर्ततेच्या आश्वासनानंतर राहुल गायकवाड यांच्या अन्नत्याग आंदोलनाची सांगता

Wed 18-Mar-2026,11:12 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : शहरातील अतिक्रमण, सरकारी जमिनींच्या कथित गैरव्यवहारांची चौकशी आणि पत्रकार सुरक्षेसंदर्भातील मागण्यांसाठी सुरू करण्यात आलेले पत्रकार राहुल गायकवाड यांचे अनिश्चितकालीन अन्नत्याग आंदोलन अखेर दुसऱ्याच दिवशी मागे घेण्यात आले. प्रशासनाने मागण्यांवर सकारात्मक भूमिका दर्शवत ठोस आश्वासने दिल्यानंतर गायकवाड यांनी आंदोलन समाप्त केले.

शहरातील मुख्य मार्गांवरील वाढत्या अतिक्रमणामुळे अपघातांची संख्या वाढत असल्याचा मुद्दा उपस्थित करत तात्काळ अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच शहरातील ३१ बट्टे आणि विसापूर येथील ६९ बट्टे सरकारी भूखंडांच्या कथित फसव्या खरेदी-विक्री प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणीही आंदोलनात करण्यात आली होती.

याशिवाय, एका पत्रकाराला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात संबंधित लाकूड व्यापाऱ्यावर महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी गायकवाड यांनी लावून धरली होती. मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता.

दरम्यान, प्रशासनाने हस्तक्षेप करत येत्या आठवडाभरात शहरातील अनधिकृत अतिक्रमण हटविण्याची कारवाई हाती घेण्यात येईल, तसेच भूखंड प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. पत्रकारांवरील हल्ल्यांच्या प्रकरणात कायद्यानुसार कारवाईसाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

या आश्वासनांनंतर गायकवाड यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतले. उपोषण सोडविण्यावेळी न.प.चे उपमुख्याधिकारी रवींद्र भंडारवार, पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे, नगर परिषद कार्यालयीन अधीक्षक नंदकिशोर सातपुते यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते निंबूपाणी पाजून आंदोलनाची सांगता करण्यात आली.

या वेळी काशीनाथ सिंह, पवन भगत, राजु झोडे, कर्मवीर सौदागर, पत्रकार रमेश निषाद, प्रशांत वैरागडे, सुरेश रंगारी, प्रमोद गहलोत, शंकर महाकाली, रामू मेदरवार सह आदी उपस्थित होते.