खरांगणा गोडे येथील महादेव मंदिर सौंदर्यीकरण कामाची चौकशी करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

Tue 16-Jun-2026,03:18 AM IST -07:00
Beach Activities

खरांगणा गोडे येथील महादेव मंदिर सौंदर्यीकरण कामाची चौकशी करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

वर्धा, प्रतिनिधी : इरशाद शाह

वर्धा तालुक्यातील खरांगणा गोडे येथील स्मशानभूमी व महादेव मंदिर परिसरात सुरू असलेल्या सौंदर्यीकरणाच्या कामात निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत असल्याचा आरोप करत युवा परिवर्तन की आवाज सामाजिक संघटनेने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. सदर कामाची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

निवेदनानुसार, जिल्हा वार्षिक योजना (जनसुविधा) अंतर्गत सुमारे ७ लाख रुपयांच्या निधीतून स्मशानभूमी व महादेव मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण सुरू आहे. मात्र कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर त्रुटी आढळून आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महादेव मंदिराची इमारत जुनी असून तिचा पाया खचलेल्या अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत फ्लोअरिंगचे काम करण्यात आले. मात्र फ्लोअरिंगखाली वापरण्यात आलेले लोखंडी बार केवळ ४ मिमी जाडीचे असून ते दोन ते तीन फूट अंतरावर बसविण्यात आल्याचे तसेच त्यांची योग्य बांधणी करण्यात आली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय आवश्यक काँक्रीट बेस न देता थेट मसाला टाकून फ्लोअरिंगचे काम करण्यात आल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. त्यामुळे भविष्यात फ्लोअरिंग तडकणे, खचणे किंवा संपूर्ण कामाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. सार्वजनिक निधीतून सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून शासनाच्या निधीचा अपव्यय होण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सदर कामाची तांत्रिक चौकशी करून संबंधित अधिकारी व कंत्राटदारांकडून कामाची गुणवत्ता तपासण्यात यावी तसेच आवश्यक सुधारणा झाल्यानंतरच पुढील कामास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

निवेदन सादर करताना युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे जिल्हा संघटक दिनेश परचाके, जिल्हा उपाध्यक्ष अमन नारायणे, शाखा प्रमुख इरशाद शाह, ईशान उधेवाल, गौरव येटे, प्रशांत गुरनुले, यश गोडे, अक्षय उईके, अनिकेत उईके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.