पोलीस भरती 2026 दरम्यान वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांची अधिसूचना

Tue 10-Feb-2026,12:47 AM IST -07:00
Beach Activities

पोलीस भरती 2026 दरम्यान वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांची अधिसूचना

वर्धा | जिल्हा विशेष प्रतिनिधी : युसूफ पठाण

वर्धा जिल्ह्यात दिनांक 11 फेब्रुवारी 2026 ते 23 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पोलीस भरती 2026 प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या कालावधीत भरतीसाठी पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी (800 मीटर व 1600 मीटर धाव) आयोजित करण्यात येणार आहे.

सदर मैदानी चाचणी प्रारंभी जिल्हा क्रीडा संकुल, वर्धा येथे घेण्याचे नियोजन होते. मात्र, जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या दुरुस्ती कामामुळे ही चाचणी सेवाग्राम फ्लायओव्हर ते दत्तापूर टी-पॉईंट दरम्यान नव्याने बांधलेल्या रस्त्यावर आयोजित करण्यात येत आहे.

या अनुषंगाने कार्यालय आदेश क्रमांक वनिषा/पोलीस भरती/अधिसूचना/2026, वर्धा नुसार तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 33 (1)(ब) अन्वये, सेवाग्राम फ्लायओव्हर ते दत्तापूर टी-पॉईंट या मार्गावरील वाहतूक दररोज सकाळी 5.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत खालीलप्रमाणे पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

पर्यायी वाहतूक मार्ग :

1) दत्तापूर टी-पॉईंट ते सेवाग्रामकडे जाणारी वाहतूक :

दत्तापूर टी-पॉईंट → नळवाडी रोड → गोपुरी रोड → विश्रामगृह → महात्मा गांधी पुतळा → सेवाग्राम फ्लायओव्हर → सेवाग्राम

2) सेवाग्राम फ्लायओव्हर ते दत्तापूर टी-पॉईंटकडे जाणारी वाहतूक :

सेवाग्राम फ्लायओव्हर → महात्मा गांधी पुतळा → विश्रामगृह → गोपुरी रोड → नळवाडी रोड → दत्तापूर टी-पॉईंट

वर्धा जिल्हा पोलीस दलाने उपरोक्त मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, जेणेकरून पोलीस भरती 2025-26 प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.

तसेच, भरती प्रक्रियेच्या कालावधीत येणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी सदर मार्गावरील वाहतूक पूर्ववत (सामान्य) सुरू राहील, याची नोंद घ्यावी, असेही कळविण्यात आले आहे.

(विलास पाटील)

पोलीस निरीक्षक,

वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा