जुन्या वादातून तलवार-दांड्याने हल्ला, तरुण गंभीर जखमी
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर: शहरातील दादाभाई नौरोजी वॉर्ड परिसरात जुन्या वादातून २० वर्षीय तरुणावर तलवार व दांड्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात समीर कलीम खान (वय २०), रा. दादा नौरोजी वॉर्ड, बल्लारपूर हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ डिसेंबर २०२५ रोजी समीर खानचा वाढदिवस साजरा करताना जस्सी अदनकोंडावार याच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यावेळी जस्सीने समीरला धमकी दिल्याचा आरोप आहे. या घटनेचा राग मनात धरूनच आरोपींनी हल्ला केल्याचे सांगण्यात येते.
१४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास समीर हा आपल्या मित्रांसह दादाभाई नौरोजी वॉर्डातील मातामंदिराजवळ बसलेला असताना जस्सी, वि-या, गिट्टू व ओम हे चौघे दोन मोपेडवर तेथे आले. कोणताही वाद न घालता त्यांनी समीरवर तलवार व दांड्याने सपासप मारहाण केली. समीरच्या डोक्यावर, मानेवर, दोन्ही हातांवर व पायांवर वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले, त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.
जखमी समीरला तातडीने ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपींविरुद्ध भा.न्या.सं. कलम १०९(१), ३(५) तसेच शस्त्र नियम कायदा कलम ४, २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी यशवंत उर्फ जस्सी अदनकोंडावार (वय २५), रा. महाराणा प्रताप वॉर्ड बल्लारपूर व लक्ष्मण उर्फ गिट्टू मोगरे (वय १८), रा. किल्ला वॉर्ड बल्लारपूर या दोघांना अटक करण्यात आली असून उर्वरित दोन आरोपी फरार आहेत.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शब्बीर खान पठाण करीत आहेत.