शास्त्रीय साहित्यातील भावनांची जागा कृत्रिम बुद्धिमत्ता घेऊ शकत नाही — डॉ. देवेंद्र पुनसे

Thu 16-Oct-2025,12:51 AM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक 

यशवंत महाविद्यालयात इंग्रजी साहित्य अभ्यासमंडळाचे उद्‌घाटन

वर्धा : गतकाळातील साहित्यिकांनी साकारलेल्या साहित्यातील भावना आणि अभिव्यक्ती आजच्या काळात दुर्मीळ होत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता हे उपयुक्त साधन असले तरी, ती मानवी भावनांनी ओतप्रोत असलेल्या शास्त्रीय साहित्याची जागा घेऊ शकत नाही, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. देवेंद्र पुनसे यांनी व्यक्त केले.

ते यशवंत महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातर्फे आयोजित ‘A Morning of Prose and Poetry’ या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. त्यांच्या विचारांनी उपस्थित विद्यार्थी आणि श्रोत्यांना साहित्याच्या मूळ संवेदनशीलतेचा नवा दृष्टिकोन दिला.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सौ. पुनसे मॅडम उपस्थित होत्या. डॉ. पुनसे यांच्या हस्ते इंग्रजी साहित्य अभ्यासमंडळाचे औपचारिक उद्‌घाटन करण्यात आले.

अभ्यासमंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कोमल वऱ्हाडे (अध्यक्ष), प्रियांशू गौतम (उपाध्यक्ष), भरत कळणे (सचिव), मृणाली काकडे (कोषाध्यक्ष) यांची निवड झाली. तर प्रतिक्षा शर्मा, धनेश्वरी वर्मा आणि अल्फिया शहा या सदस्य म्हणून निवडल्या गेल्या.

प्राचार्य डॉ. ठाकरे म्हणाले की, “अशा नवोन्मेष उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी साहित्याच्या सृजनशील सामर्थ्याची जाणीव होते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास प्रेरणा मिळते.”

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कविता आणि मनोगतांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. जमील अख्तर, तेजस्विनी सुपारे, विपश्यना कांबळे, शुभम माने, आणि कावेरी वर्भे यांच्या कवितांनंतर प्रांजली काठवते हिने सादर केलेल्या गीताने कार्यक्रमाला सुरेल स्पर्श दिला.

इंग्रजी विभागप्रमुख डॉ. माधुरी सिडाम यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश — विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी साहित्याविषयी अभिरुची निर्माण करणे आणि त्यांची सर्जनशीलता विकसित करणे — स्पष्ट केला.

कार्यक्रमाचे संचालन मिनल कोसुलकर आणि धनेश्वरी वर्मा यांनी केले, तर अल्फिया शहा हिने आभार मानले. इंग्रजी विभागातील प्राध्यापक डॉ. अभिजीत वाघाडे, प्रा. अमित पोहनकर, प्रा. हिमांशू ढोके, प्रा. कल्याणी टेंभरे, प्रा. रमाकांत चव्हाण, प्रा. प्रशिक थुल, प्रा. प्रणाली कापसे, प्रा. आचल महाजन, आणि प्रा. नूतन महाजन यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचा समारोप साहित्य विषयावरील संवादात्मक सत्राने झाला.