बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी : बामनी येथे हॅकाथॉन २०२५ उत्साहपूर्ण सुरुवात

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (बी.आय.टी.), बामनी येथे आज २४ तासांचा हॅकाथॉन २०२५ या तंत्रज्ञानावर आधारित स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला. हा उपक्रम ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (टी.ए.टी.आर.) व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. सहअस्तित्वासाठी नवनिर्मिती ही यावर्षीची थीम असून, मानव आणि वन्यजीव यांच्यातील समतोल साधण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करून टिकाऊ उपाय शोधणे हा या हॅकाथॉनचा प्रमुख उद्देश आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित रुची टंडन (प्रॉडक्ट अँड स्ट्रॅटेजी कन्सल्टंट व लीडरशिप कोच) यांच्या हस्ते करण्यात आले. मिस टंडन या आय.बी.एम., मायक्रोसॉफ्ट, मेझॉन आणि सॅमसंग यांसारख्या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये वीस वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या तज्ज्ञ असून, त्यांनी बी.आय.टी.एस. पिलानी येथून पदवी आणि अमेरिकेतून उच्च शिक्षण घेतले आहे.
आपल्या उद्बोधनात टंडन यांनी सांगितले की, या हॅकाथॉनमधील आव्हाने स्थानिक मर्यादांपलीकडची असून ती जागतिक स्वरूपाची आहेत. विद्यार्थ्यांनी नव्या कल्पनांच्या साहाय्याने तंत्रज्ञानाचा वापर करून टिकाऊ उपाय शोधावेत, असे त्या म्हणाल्या.
या प्रसंगी कार्याध्यक्ष संजय वासाडे, प्राचार्य/ संचालक डॉ. राजनीकांत मिश्रा, प्रा. श्रीकांत गोजे, डॉ. झेड. जे. खान, प्रा. सी. सत्यनारायण, डॉ. अर्चना निमकार आणि लव्हली शर्मा हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन आदित्य वैरागडे व रागिणी यादव या विद्यार्थ्यांनी केले. या २४ तासांच्या हॅकाथॉनमध्ये एकूण २५ संघ सहभागी झाले असून, हे संघ नागपूर, चंद्रपूर, वर्धा, तेलंगणा राज्य आणि बी.आय.टी. कॉलेज येथून सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांना नवकल्पना राबविण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन, औद्योगिक मेंटरशिप आणि सहयोगी वातावरण प्रदान करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बी.आय.टी.च्या सॉफ्टवेअर विकास विभागातील पियुष गुप्ता आणि सर्बानी सिन्हा तसेच अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी आदित्य यादव आणि रोहित अप्पलवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
बी.आय.टी. आणि टी.ए.टी.आर. यांच्या संयुक्त प्रयत्नातून शिक्षण, तंत्रज्ञान आणि पर्यावरण संवेदनशीलतेचा सुंदर संगम साधला गेला असून, या उपक्रमातून युवकांना अधिक संतुलित आणि टिकाऊ जगासाठी नवनिर्मितीची प्रेरणा मिळत आहे.