कुरझडी जामठा परिसरातील एस.टी. बस सेवा तात्काळ सुरू करण्याची नागरिकांची मागणी
वर्धा तालुका प्रतिनिधी इरशाद शाह
वर्धा:कुरझडी–जामठा (ता. वर्धा, जि. वर्धा) परिसरातील नागरिकांना एस.टी. महामंडळाची नियमित बस सेवा बंद असल्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बस सेवा नसल्याने विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, व्यापारी तसेच रुग्णांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
या संदर्भात स्थानिक नागरिकांनी विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याकडे निवेदन सादर करून कुरझडी–जामठा मार्गावर तात्काळ नियमित एस.टी. बस सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.
मागील काही काळापासून ही सेवा बंद असल्यामुळे शिक्षण, आरोग्य सेवा व रोजगारावर विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शासन ग्रामीण भागातील दळणवळणासाठी विविध योजना राबवत असताना या परिसराकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नियमित बस सेवा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाणे सुलभ होईल, तसेच सामान्य नागरिकांना दैनंदिन कामांसाठी मोठा दिलासा मिळेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
जर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही, तर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. निवेदनावर कुरझडी–जामठा परिसरातील अनेक नागरिकांच्या सह्या असून प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
अमित भोसले आशिष जाचक रोशन भोसले बादल नाईक शेखर इंगोले अमोल भोसले