खरांगणा गोडे येथील तलाठी कार्यालय सेवाग्रामला स्थलांतरित,नागरिकांची मोठी गैरसोय

Mon 05-Jan-2026,04:33 AM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक 

वर्धा:वर्धा तहसील अंतर्गत असलेले खरांगणा गोडे येथील तलाठी कार्यालय अचानक सेवाग्राम येथे शिफ्ट करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. मागील अनेक वर्षांपासून खरांगणा गोडे येथे सुरू असलेल्या या तलाठी कार्यालयात खरांगणा गोडे, कुटकी, करंजी काजी, वायगाव रीठ, पवनी, मोरांगणा आदी गावांचा समावेश असून हे कार्यालय नागरिकांसाठी अत्यंत सोयीचे होते.

मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता हे कार्यालय सेवाग्राम येथे हलविण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत संबंधित तलाठ्यांकडे विचारणा केली असता, खरांगणा गोडे येथील कार्यालय भाडेतत्त्वावर असून मागील सुमारे १० वर्षांचा भाडा अदा करण्यात आलेला नाही. दरमहा सुमारे १ हजार रुपये भाडे असल्याची माहिती देण्यात आली.

अल्प भाड्याच्या कारणावरून कार्यालय स्थलांतरित करणे कितपत योग्य आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. सेवाग्राम हे संबंधित महसूल मंडळातील अनेक गावांसाठी दूर असल्याने शेतकरी, वृद्ध व सर्वसामान्य नागरिकांना वारंवार ये-जा करणे कठीण होत आहे.

या पार्श्वभूमीवर तलाठी कार्यालय पूर्वीप्रमाणे खरांगणा गोडे येथे तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. तसेच, शासनाकडे भाड्याकरिता निधी उपलब्ध नसेल, तर नागरिक भिक मागो आंदोलन करून पैसे जमा करण्यासही तयार आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हे निवेदन युवा परिवर्तन की आवाज सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे, जिल्हा संघटक दिनेश परचाके, हेमंत भोसले, शेखर इंगोले, शाखा प्रमुख इरशाद शहा, तालुकाध्यक्ष अमन नारायण यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देण्यात आले.