शिवजयंतीनिमित्त वीरा वॉरियर्स ग्रूपतर्फे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम

Fri 20-Feb-2026,04:51 AM IST -07:00
Beach Activities

शिवजयंतीनिमित्त वीरा वॉरियर्स ग्रूपतर्फे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम

अब्दुल कदीर बख्श 

हिंगणघाट : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वीरा वॉरियर्स बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित वीरा वॉरियर्स ग्रूप तर्फे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात पार पडले. दिवसभर विविध सांस्कृतिक, ऐतिहासिक व पारंपरिक उपक्रमांनी परिसर दणाणून गेला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी भव्य पदयात्रेने झाली. पदयात्रेत लेझीम, काडीपट्टा, चक्कर, फुगडी अशा पारंपरिक कलांचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले. पदयात्रेला डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यालय येथून प्रारंभ झाला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी शिवगर्जना, पोवाडा, लेझीम, काडीपट्टा व चक्कर सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विशेष आकर्षण ठरले ते लहान विद्यार्थ्यांनी साकारलेले शिवकालीन वेशभूषेतील सादरीकरण.

सायंकाळी डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यालयाच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल भाऊ जवादे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील राजा नसून प्रत्येकाच्या प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या शौर्य, स्वाभिमान व राष्ट्रनिष्ठेचा आदर्श युवकांनी समोर ठेवावा.”

कार्यक्रमास खेळाडू, पालक, स्थानिक नागरिक व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शेवटी सर्वांनी एकत्र येऊन “जय भवानी, जय शिवाजी”चा जयघोष करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अनिल जवादे, प्रमुख पाहुणे म्हणून गोरख भगत सर, प्राचार्या खैरकार मॅडम, माजी प्राचार्य सुधीर राऊत सर, देवतळे सर, भोयर सर, भोमले सर, गोपाल मांडवकर सर, पंकज ठाकरे सर, पपेश मुंजेवार सर ,अजय मुळे, गौरव खिराळे व वीरा वॉरियर्स ग्रूप चे संस्थापक रोहित राऊत सर उपस्थीत होते.

या कार्यक्रमाचे आयोजन वीरा वॉरियर्स सीनिअर ग्रूपने केले, तर संपूर्ण नियोजन ज्युनिअर ग्रूपने सांभाळले. सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात सक्रिय असलेल्या वीरा वॉरियर्स ग्रूपच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व संस्कारांची जाणीव अधिक दृढ होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.