सेलू (काटे) परिसरात चोरीच्या डिझेलची खुलेआम विक्री पोलिसांच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा सवाल
सेलू (काटे) परिसरात चोरीच्या डिझेलची खुलेआम विक्रीपो,लिसांच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा सवाल
सावंगी मेघे | मुख्य संपादक नावेद पठाण
वर्धा–वायगाव रोडवरील सेलू (काटे) परिसरात चोरीच्या डिझेलची अवैध विक्री खुलेआम सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्थानिक सूत्रांनुसार, एका पंचर दुकानाच्या आडून दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणावर डिझेलची तस्करी केली जात असल्याचा आरोप आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या कंपन्यांच्या वाहनांतून शेकडो लिटर डिझेल काढून ते गुप्त ठिकाणी साठवले जाते. त्यानंतर हे डिझेल कमी दरात स्थानिक वाहने तसेच ट्रॅक्टरधारकांना विकले जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. दीर्घकाळ सुरू असलेल्या या अवैध प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या प्रकरणातील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे सावंगी मेघे पोलीस ठाणे हद्दीत असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून येत नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, हा परिसरातील अवैध डिझेल चोरीचा दुसरा मोठा खुलासा मानला जात आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये “थाना प्रभारीची हाताची घडी आणि तोंडची बोट कधी हटणार?” अशी चर्चा रंगली असून, वेळेत कठोर पावले उचलली नाहीत तर हा अवैध धंदा आणखी फोफावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता नागरिकांचे लक्ष वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संभाव्य कारवाईकडे लागले आहे.
हा प्रकार सेलू (काटे) परिसरासह वर्धा जिल्ह्यातील इंधन तस्करीविरोधातील कारवाईवर प्रश्न उपस्थित करणारा ठरत आहे.