प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे भव्य देशभक्ती गीतगायन स्पर्धेचे आयोजन

Sat 24-Jan-2026,11:58 PM IST -07:00
Beach Activities

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे भव्य देशभक्ती गीतगायन स्पर्धेचे आयोजन

‘२६ जानेवारीची संध्याकाळ वीर महापुरुषांच्या नावाने’ उपक्रम; शंभरहून अधिक स्पर्धकांचा सहभाग

वर्धा | जिल्हा विशेष प्रतिनिधी : युसूफ पठाण

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य जिल्हास्तरीय देशभक्ती व प्रेरणादायी गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व काँग्रेसप्रेमी यांच्या पुढाकारातून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे.

या स्पर्धेत वर्धा जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यांमधूनही जवळपास १०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेची पूर्वचाचणी शनिवारी, २४ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत इंदिरा सद्भावना भवन, मगन संग्रहालयासमोर, बॅचलर रोड, वर्धा येथे पार पडली.

मुख्य स्पर्धेचे परीक्षण संगीत विशारद श्री. श्रीकांत झाडे (संचालक, स्वरनाद म्युझिक अकॅडमी) तसेच अपूर्वाताई देशमुख (बी.ए., एम.एड., संगीत विशारद) करणार असून, जिल्ह्यातील नामवंत संगीत वादक कार्यक्रमाला संगीतसाथ देणार आहेत.

मुख्य कार्यक्रम सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ८ या वेळेत जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या परिसरासमोर आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्यक्रमाला पक्षाच्या भूमिकेनुसार शीर्षक देण्यात आले असून, यावर्षी “मनरेगा बचाव संग्राम” या शीर्षकाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभास पक्षाचे वरिष्ठ नेते, जिल्ह्यातील सर्व विभागीय अध्यक्ष, शहर अध्यक्ष तसेच पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मिलिंदभाऊ झांबरे (सेलू, घोडेगाव) व सौ. अरुणाताई मो. सावरकर (कारंजा घाडगे) करणार आहेत.

स्पर्धेमध्ये रोख पारितोषिके, विशेष पुरस्कार तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना गौरविण्यात येणार आहे. तरी वर्धा शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व काँग्रेसप्रेमींच्या वतीने करण्यात आले आहे.