भरत नागपाल हत्याकांडाच्या निषेधार्थ हिंगणघाटमध्ये कॅंडल मार्च; आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी
भरत नागपाल हत्याकांडाच्या निषेधार्थ हिंगणघाटमध्ये कॅंडल मार्च; आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी
हिंगणघाट : पुलगाव येथील पंजाबी समाजातील युवा समाजसेवक भरत नागपाल यांच्या निर्घृण हत्येमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या जघन्य हत्याकांडाच्या निषेधार्थ तसेच दिवंगत भरत नागपाल यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मंगळवार, १० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता हिंगणघाट शहरात कॅंडल मार्च व मूक निषेध मोर्चा काढण्यात आला.
पंजाबी सेवा समाज आणि पंजाबी महिला मंडळ यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या कॅंडल मार्चमध्ये शहरातील विविध समाजघटकांतील नागरिक, महिला तसेच मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. हा कॅंडल मार्च कारंजा चौक येथून सुरू होऊन सुभाष चौक, विठोबा चौक, आंबेडकर चौक आणि महावीर भवन चौक मार्गे पुन्हा कारंजा चौक येथे येऊन समाप्त झाला.
कॅंडल मार्चदरम्यान नागरिकांनी हातात मेणबत्त्या घेऊन मौन पाळत भरत नागपाल यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच या हत्याकांडातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली.
दरम्यान, भरत नागपाल हत्या प्रकरणात दररोज नवनवीन घडामोडी समोर येत असल्याने समाजात संताप वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मृतकाचे मूळ गाव पुलगावसह नागपूर, वर्धा, वणी आणि हिंगणघाट येथेही निषेध मोर्चे व आंदोलन करण्यात आले.
भरत नागपाल हे अत्यंत मिलनसार, प्रतिभावान आणि समाजकार्यात सक्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. समाजातील विविध घटकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याने त्यांच्या हत्येने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी निष्पक्ष व कठोर कारवाई करून भरत नागपाल यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.