आरमोरीकरांच्या आरोग्याशी खेळ सुरूच? गढूळ आणि विना फिल्टर पाणीपुरवठा, चौकशी करून दोषींवर कारवाईची काँग्रेसची मागणी

Sun 19-Jul-2026,10:02 PM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली 

गडचिरोली:आरमोरी शहरातील जुना बस स्टँड (पाळी) परिसरात रविवारी सायंकाळी नागरिकांच्या नळांमधून अत्यंत गढूळ व विना फिल्टर केलेले पाणीपुरवठा झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पावसाळ्यात जलजन्य आजारांचा धोका वाढलेला असताना अशा प्रकारचे दूषित पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचणे ही अत्यंत गंभीर बाब असून, हा केवळ प्रशासनाचा निष्काळजीपणा नसून नागरिकांच्या आरोग्याशी आणि जीवाशी खेळ असल्याचा आरोप काँग्रेस तालुका अध्यक्ष तथा माजी नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांनी केला आहे.

अनेकांनी हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे सांगत नगर परिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शहरवासीयांना सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी देणे ही नगर परिषदेची मूलभूत जबाबदारी असताना अशा प्रकारे दूषित पाणीपुरवठा होणे अत्यंत धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

मिलिंद खोब्रागडे यांनी रोखठोक शब्दांत सांगितले की, "सत्ताधारी आणि संबंधित अधिकारी शहराच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत. नागरिकांच्या घरात गढूळ व विना फिल्टर पाणी पोहोचत असेल तर त्याची संपूर्ण जबाबदारी नगर परिषद प्रशासन आणि संबंधित पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली पाहिजे. पावसाळ्यात अशा प्रकारचा निष्काळजीपणा नागरिकांच्या जीवावर बेतू शकतो."

त्यांनी पुढे इशारा देत म्हटले की, "जर या दूषित पाण्यामुळे एखादा नागरिक आजारी पडला किंवा कोणतीही गंभीर आरोग्याची समस्या निर्माण झाली, तर संबंधित अधिकारी आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी मिळता कामा नये."

काँग्रेसच्या वतीने नगर परिषद प्रशासनाकडे पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:

गढूळ पाणीपुरवठ्याची तातडीने चौकशी करण्यात यावी.

पाणी शुद्धीकरण केंद्राची आणि फिल्टर यंत्रणेची तांत्रिक तपासणी करण्यात यावी.

दोषी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.

शहरातील प्रत्येक नागरिकाला नियमित, स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे.

पाण्याच्या गुणवत्तेचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा.

शहराच्या विकासाच्या घोषणा करण्यापेक्षा नागरिकांना सुरक्षित पिण्याचे पाणी देणे ही नगर परिषदेची पहिली जबाबदारी असल्याचे सांगत, प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना न केल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मिलिंद खोब्रागडे यांनी दिला.

"स्वच्छ, शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. त्या हक्काशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले.