बँक कॉलनी विकासाच्या दिशेने एक पाऊल,आ. राजू नवघरे यांच्या हस्ते भूमिपूजन
प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली वसमत शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील बँक कॉलनी परिसरातील नागरिकांची अनेक दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली असून, येथील रस्ता व आरसीसी नाली बांधकामाच्या विकासकामाचा शुभारंभ आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते दि. १६ मे रोजी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.
अरुण देशमुख यांच्या घरापासून ते पवार यांच्या घरापर्यंत होणाऱ्या या विकासकामामुळे परिसरातील खराब रस्ते आणि सांडपाण्याच्या समस्येपासून नागरिकांची मोठी सुटका होणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत या कामाचे स्वागत केले.
भूमिपूजन कार्यक्रमाला नगराध्यक्ष प्रतिनिधी कन्हैया बाहेती, उपनगराध्यक्ष अली, नगरसेवक इम्रान स. नय्युम स. पाशा, नगरसेविका आयशा शेख खदीर कुरेशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
यावेळी आमदार राजू नवघरे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत, प्रत्येक प्रभागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्याने काम सुरू असल्याचे स्पष्ट केले. तसेच प्रभागातील इतर प्रलंबित विकासकामेदेखील लवकरच मार्गी लावली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमाला बँक कॉलनी परिसरातील नागरिक, महिला, युवक तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांनी विशेष मेहनत घेतली.