तोडगा न निघाल्याने प्रयोगशाळा तंत्रज्ञ आक्रमक; न्याय न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

Sun 25-Jan-2026,05:08 AM IST -07:00
Beach Activities

तोडगा न निघाल्याने प्रयोगशाळा तंत्रज्ञ आक्रमक; न्याय न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

सेवाग्राम : युसूफ पठाण

महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था व कस्तुरबा हेल्थ सोसायटीतील प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅबोरेटरी टेक्निशियन) कर्मचारी २१ जानेवारीपासून बेमुदत उपोषणावर असून, न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. उपोषणावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने २४ जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी वर्धा यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. मात्र चर्चेनंतरही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने उपोषण सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले.

उपोषणकर्त्यांच्या नियमितीकरण, योग्य पदनाम, वेतनश्रेणी व इतर सेवा लाभांबाबत बैठकीत चर्चा झाली. तरीही संस्थेकडून सकारात्मक निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

प्रमुख मागण्या :

मूळ जाहिरातीनुसार प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदावर सेवेत नियमित करणे, यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या ३ वर्षे २१ दिवसांच्या प्रोबेशन कालावधीचा विचार करून नियमितीकरण देणे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदानुसार योग्य वेतनश्रेणी लागू करणे, तसेच जाहिरातीत नमूद असलेल्या पदाऐवजी ‘प्रयोगशाळा तंत्रज्ञ (कनिष्ठ)’ म्हणून दिलेली नियुक्ती रद्द करून योग्य पदनाम व वेतनमान देणे.

सदर कर्मचारी गेल्या तीन वर्षांपासून प्रोबेशन कालावधीवर कार्यरत असूनही नियमितीकरण व योग्य वेतनमान न मिळाल्याने अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

२४ जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीस महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. अजम शुक्ला, सेवाग्राम पोलीस ठाण्याचे अधिकारी नागेश कुमार चतरकर यांच्यासह उपोषणकर्ते सुमेध पाटील, प्रियंका शहाणे, शोहेब खान उपस्थित होते. सध्या सुमेध पाटील, स्वप्निल वरघणे, शोएब खान, सारिका कांबळे व प्रतिभा देवतळे हे कर्मचारी उपोषणावर बसले आहेत.

प्रतिक्रिया :

“आमच्या मागण्या नियमास अनुरूप आहेत. संस्थेच्या चुकीच्या निर्णयांमुळे आमच्यावर अन्याय होत आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनीही मागण्या योग्य असल्याचे सांगितले. तरीही न्याय न मिळाल्यास आंदोलन तीव्र करू,” असे उपोषणकर्ते शोहेब खान यांनी सांगितले.