RTOच्या वाहनाची PUC संपलेली; दंड कोण करणार? – भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष आशीष सोनटक्के यांचा सवाल
RTOच्या वाहनाची PUC संपलेली; दंड कोण करणार? – भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष आशीष सोनटक्के यांचा सवाल
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
वर्धा | सामान्य नागरिकांच्या वाहनांवर नियमभंगाबाबत दंड आकारणाऱ्या आरटीओच्या शासकीय वाहनाचीच PUC (प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र) मुदत संपलेली असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष आशीष सोनटक्के यांनी सवाल उपस्थित केला आहे.
९ मार्च २०२६ रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) सालोड-हिरापूर, वर्धा येथे कामानिमित्त गेले असता कार्यालयासमोर उभ्या असलेल्या MH-04-MF-4399 या शासकीय वाहनाची PUC ३० ऑक्टोबर २०२५ रोजीच संपल्याचे दिसून आले. तरीही हे वाहन गेल्या पाच महिन्यांपासून वापरात असल्याचे आढळून आले.
सदर वाहनावरूनच वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाते. सामान्य नागरिकांकडे कागदपत्रे नसल्यास हजारो रुपयांचा दंड आकारला जातो. मात्र शासकीय वाहनाची PUC संपल्यानंतरही त्यावर कारवाई का होत नाही, असा प्रश्न सोनटक्के यांनी उपस्थित केला आहे.
आरटीओ विभाग नागरिकांना PUC, विमा, फिटनेस आदी कागदपत्रे वेळेत नूतनीकरण करण्याबाबत जनजागृती करतो. परंतु स्वतःच्या वाहनाबाबतच नियमांचे पालन होत नसल्यास हा दुहेरी मापदंड असल्याची टीका त्यांनी केली.
याबाबत माहिती विचारली असता जनमाहिती अधिकारी तथा मोटार वाहन निरीक्षक संदीप मुखे यांनी समाधानकारक उत्तर दिले नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संबंधित शासकीय वाहनावर दंडात्मक कारवाई करावी तसेच पाच महिन्यांपासून वाहन वापरणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी वर्धा, जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली असून न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष आशीष सोनटक्के यांनी दिला आहे.