महिला दिनी वर्धा पोलिसांकडून महिला वाहतूक पोलिसांचा सन्मान

Mon 09-Mar-2026,10:38 PM IST -07:00
Beach Activities

महिला दिनी वर्धा पोलिसांकडून महिला वाहतूक पोलिसांचा सन्मान

वर्धा | जिल्हा विशेष प्रतिनिधी : युसूफ पठाण

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त वर्धा शहरातील वाहतूक नियंत्रण शाखेत कार्यरत महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा वर्धा पोलिस प्रशासनाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. कडाक्याच्या उन्हात व प्रतिकूल परिस्थितीतही रस्त्यांवर कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसांच्या समर्पणाची दखल घेत हा उपक्रम राबविण्यात आला.

पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात महिला पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करण्यात आले. समाजाची सुरक्षा आणि शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महिला पोलिसही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या प्रसंगी उत्कृष्ट सेवा व कर्तव्यपरायणतेबद्दल ज्योत्स्ना मेश्राम, प्रज्ञा भानारकर, चंदा हाडके, रोशनी कौरती, अंजू गजबे, लक्ष्मी कश्यप आणि प्रमोदिनी डोडारमल या महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

वाढत्या उष्णतेचा विचार करून प्रशासनाच्या वतीने महिला पोलिसांना शुद्ध पाण्यासाठी ‘मिल्टन’च्या पाण्याच्या बाटल्या, उन्हापासून संरक्षणासाठी विशेष दुपट्टे तसेच पुष्पगुच्छ व मिठाई देऊन त्यांचे मनोबल वाढविण्यात आले.

यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिला पोलिसांचे कर्तव्यनिष्ठ काम समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांचा हा सन्मान त्यांच्या सेवेला दिलेला कृतज्ञतेचा मान आहे.