वर्धा–आर्वी मार्गावरील विद्युत खांब ठरताहेत अपघातांचे कारण

Wed 11-Feb-2026,01:37 AM IST -07:00
Beach Activities

वर्धा–आर्वी मार्गावरील विद्युत खांब ठरताहेत अपघातांचे कारण

ग्रामपंचायत पिपरी (मेघे) परिसरात अपघातांची मालिका; युवा संघर्ष सामाजिक संघटनेचा प्रशासनाला इशारा

वर्धा जिल्हा प्रतिनिधि युसूफ पठाण

वर्धा–आर्वी मार्गावरील ग्रामपंचायत पिपरी (मेघे) हद्दीतील रस्त्यावर उभे असलेले विद्युत खांब नागरिकांच्या जीवाला धोका ठरत असून, हे खांब प्रकाशासाठी की नागरिकांचे प्राण घेण्यासाठी, असा संतप्त सवाल युवा संघर्ष सामाजिक संघटना, पिपरी (मेघे) यांच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.

सन २०१८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुनापानी रिंग रोड या मार्गावरील सुमारे ३५ कोटी रुपयांच्या रस्ते विकासकामाचे भूमिपूजन तत्कालीन वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा विद्यमान आमदार मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. या प्रकल्पात सिमेंट काँक्रीट रस्ता, नाल्या, फुटपाथ, गटार बांधकाम, रोड डिव्हायडरचे सौंदर्यीकरण तसेच वाहतुकीस अडथळा ठरणारे विद्युत खांब हटविणे आदी कामांचा समावेश होता.

मात्र, तब्बल आठ वर्षांनंतरही रस्ते विकासकाम संथगतीने सुरू असून, अनेक ठिकाणी विद्युत खांब आजही रस्त्याच्या मधोमध तसेच कडेला धोकादायक स्थितीत उभे आहेत. विशेष म्हणजे नगर परिषद हद्दीतील अडथळा निर्माण करणारे विद्युत खांब हटविण्यात आले असताना, ग्रामपंचायत पिपरी (मेघे) परिसरात मात्र हे खांब आजही ‘जैसे थे’ स्थितीत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या धोकादायक विद्युत खांबांमुळे आतापर्यंत अनेक लहान-मोठे अपघात घडले असून, भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. शिवाय, या खांबांवरून सतत विद्युत प्रवाह सुरू असल्याने अपघात झाल्यास जीवितहानी अटळ असल्याचेही संघटनेच्या वतीने निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

या गंभीर समस्येबाबत युवा संघर्ष सामाजिक संघटना, पिपरी (मेघे) यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक १ चे उपविभागीय अभियंता श्री. चंदेले यांना निवेदन सादर करून रखडलेले रस्ते विकासकाम तात्काळ पूर्ण करण्याची व धोकादायक विद्युत खांब त्वरित हटविण्याची जोरदार मागणी केली आहे. अन्यथा, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

या वेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजय वांदिले, अभिषेक मोहिते, साहिल ढवळे, नयन राऊत, महेश भस्मे, राजू सेलघरे, पुंडलिक राऊत, शरद वंगळ, रोशन खीरकर, मनोज जगताप, हर्षल कुकटकार, सुनील भागवतकर, प्रदीप श्रीरसागर, पद्माकर खेकडे, गुणवंत घसाड, प्रशिल चरडे, राज ठाकरे, मोहन मोहिते, प्रभाकर इंगळे, भरत मुडे, श्याम धुर्वे, सुरज वानखेडे, राहुल सरोदे, हरीश कनोजे, अरविंद सहारे, वाल्मीक ठाकरे, भगवान गडकरी, राजेंद्र सूर्यवंशी, ठाकूर, अविनाश मेश्राम, गजानन कदम, विकी पिंपळे, गजानन महाजन, आनंद धामणकर, सोनू खांडेकर, सुधीर वसू, महेंद्र लोखंडे, गजानन भातकुलकर आदी उपस्थित होते.