विद्यार्थी, युवक व जनहिताच्या प्रश्नांसाठी युवाकृतीचे वर्ध्यात शांततापूर्ण आंदोलन NEET, पेपरफुटी, बेरोजगारी, महागाई, शिक्षण व आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींविरोधात शासनाचे लक्ष वेधले
विद्यार्थी, युवक व जनहिताच्या प्रश्नांसाठी युवाकृतीचे वर्ध्यात शांततापूर्ण आंदोलन
NEET, पेपरफुटी, बेरोजगारी, महागाई, शिक्षण व आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींविरोधात शासनाचे लक्ष वेधले
वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण
वर्धा शहरात युवाकृती (YuvaKruti) या युवा संघटनेच्या पुढाकाराने विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी "Peaceful Protest in Wardha" या शांततापूर्ण आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. संविधानिक व लोकशाही मार्गाने झालेल्या या आंदोलनात शेकडो विद्यार्थी, युवक-युवती आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
आंदोलनादरम्यान NEET व CBSE परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी, वाढती बेरोजगारी, महागाई, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती, वर्धा जिल्ह्यात रोजगारनिर्मिती, जिल्हा शासकीय रुग्णालयातील सुविधा वाढविणे, सरकारी शाळांचा दर्जा उंचावणे तसेच युवकांमध्ये वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या विळख्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलनाची सुरुवात संविधानाला अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थी आणि युवकांनी हातात तिरंगा व विविध संदेशफलक घेऊन शहरातील प्रमुख मार्गांवर शांततापूर्ण मोर्चा काढला. "Protect Student, Protect India" आणि "Educate, Agitate, Organize" अशा घोषवाक्यांद्वारे शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेची मागणी करण्यात आली.
यावेळी शहीद भगतसिंग आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा हातात घेऊन शिक्षण, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचे संरक्षण करण्याचा संदेश देण्यात आला. तसेच परीक्षांतील गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची भावना व्यक्त करत पारदर्शक व विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी करण्यात आली.
युवकांनी शासनाला इशारा देत शिक्षण, रोजगार, महागाई, आरोग्य सुविधा आणि युवकांच्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी केली. अन्यथा राज्यभर व्यापक लोकशाही आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला.
युवाकृतीचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय युवा संसद सदस्य हर्ष उबाळे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत शासनाने संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी आदर्श वाघमारे, आतिफ काजी, आदित्य व्यास, NSUIचे माजी जिल्हाध्यक्ष गोविंद दिघीकर, भीम आर्मीचे अध्यक्ष आशिष सोनटक्के, शुभम, सक्षम कांबळे, अमीषा पाटील यांच्यासह अनेक विद्यार्थी, युवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, युवक, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडलेल्या या आंदोलनानंतर आयोजकांनी सर्व सहभागी, सामाजिक संघटना आणि प्रसारमाध्यमांचे आभार मानले तसेच विद्यार्थ्यांचे हक्क, रोजगार, शिक्षणातील पारदर्शकता आणि जनहिताच्या प्रश्नांसाठी संविधानिक मार्गाने लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.