वर्धा येथे मुख्याध्यापकांची सहविचार सभा उत्साहात संपन्न
वर्धा येथे मुख्याध्यापकांची सहविचार सभा उत्साहात संपन्न
विद्यार्थी सुरक्षा, शाळा पूर्वतयारी, पोषण आहार, आरोग्य व गुणवत्तापूर्ण शिक्षणावर मार्गदर्शन
वर्धा | प्रतिनिधी : निखिल ठाकरे
आगामी शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर वर्धा येथे जिल्हा परिषद व नगर परिषद शाळांतील मुख्याध्यापकांची सहविचार सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेत शाळा पूर्वतयारी, विद्यार्थी सुरक्षा, शैक्षणिक गुणवत्ता, पोषण आहार, आरोग्य आणि विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सभेला गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, गटशिक्षणाधिकारी धर्मपाल कुमरे, वैद्यकीय अधिकारी माधुरी दिघीकर, सामान्य रुग्णालयाचे प्रमुख सोनपणे, शालेय पोषण आहार अधीक्षक प्रकाश देव्हारे, विस्तार अधिकारी चेतना भुते, जया परमार, माया चाफले, केंद्रप्रमुख राजेंद्र इंगोले, राजू गलांडे, करुणा शंभरकर तसेच वर्धा तालुक्यातील जिल्हा परिषद व नगर परिषद शाळांचे मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शाळांमधील भौतिक सुविधा, पायाभूत गरजा आणि विकासकामांसाठी ग्रामपंचायत स्तरावर वेळेत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत शाळा परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले.
सभेत विद्यार्थ्यांची उपस्थिती UDISE+ प्रणालीवर नियमित नोंदविणे, शंभर टक्के पटनोंदणी पूर्ण करणे तसेच विद्यार्थिनींच्या मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापनाबाबत संवेदनशीलतेने काम करण्यावर भर देण्यात आला.
शालेय पोषण आहार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात आवश्यक सूचना देण्यात आल्या. तसेच मुलींमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत पालकांमध्ये व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी शाळा पूर्वतयारी, प्रवेशोत्सव, शाळा मेळावा, विद्यार्थी सुरक्षा, सखी सावित्री समितीच्या नियमित बैठका, आवश्यक भौतिक सुविधांचे अहवाल, गुणवत्ता वृद्धी, STRAP उपक्रम तसेच 'मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा' अभियानाबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र इंगोले यांनी केले, तर नीता भांडवलकर यांनी आभार मानले. 'अनंत मुस्कान' उपक्रमांतर्गत शाळांना उपलब्ध झालेल्या डेंटल किटच्या योग्य वापराबाबत उपस्थितांना प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.
या सहविचार सभेच्या यशस्वी आयोजनासाठी वर्धा पंचायत समिती, नगर परिषद, सर्व मुख्याध्यापक तसेच रवी देशमुख, संजय जयंत गोठाणे, दिवाकर बेहेरे आणि विशेष शिक्षकांनी सहकार्य केले.