सिंदी (रेल्वे) येथे अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा; ८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Mon 29-Jun-2026,03:26 AM IST -07:00
Beach Activities

सिंदी (रेल्वे) येथे अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा; ८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

वर्धा | प्रतिनिधी : इरशाद शाह

पोलीस अधीक्षकांच्या ऑल आऊट मोहिमेअंतर्गत तसेच सिंदी (रेल्वे) पोलीस ठाण्याचे प्रभारी नरेंद्र निस्वादे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष कारवाईदरम्यान एका महिलेकडून अवैध देशी व विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२८ जून २०२६ रोजी पोलीस हवालदार धनराज सायाम, पोलीस कॉन्स्टेबल समीर आगे, महिला पोलीस कॉन्स्टेबल शुभांगी चापले आणि पोलीस शिपाई राजू बजाईत यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सोमनाथ मंदिराजवळील पिपरा रोड परिसरात छापा टाकला.

या कारवाईदरम्यान वर्षा सुनील जुमडे (वय ३८, रा. पिपरा रोड, सिंदी रेल्वे) हिच्या घराची झडती घेतली असता ओसी ब्ल्यू विदेशी दारूच्या १८० मिलीच्या १० निपा (किंमत ३,५०० रुपये) तसेच देशी दारूच्या १८० मिलीच्या ३५ निपा (किंमत ५,२५० रुपये) असा एकूण ८ हजार ७५० रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मुद्देमाल जप्त केला असून वर्षा सुनील जुमडे हिच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई) व ७७(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सिंदी (रेल्वे) पोलीस करीत आहेत.