प्रोजेक्ट अमृत अंतर्गत वणा नदी परिसर स्वच्छता अभियान; संत निरंकारी मिशनचा उपक्रम

Sun 22-Feb-2026,11:58 AM IST -07:00
Beach Activities

प्रोजेक्ट अमृत अंतर्गत वणा नदी परिसर स्वच्छता अभियान; संत निरंकारी मिशनचा उपक्रम

अब्दुल कदीर बख्श

हिंगणघाट — जलसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने संत निरंकारी मिशनतर्फे ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ अभियान राबविण्यात आले. दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते १०.३० या वेळेत वणा नदीतील गाडगे बाबा यात्रा परिसरात स्वच्छता मोहीम पार पडली.

या उपक्रमात हिंगणघाट नगर परिषदेच्या अध्यक्षा सौ. नैनाजी तुलसकर, नगरसेवक संजय माडे तसेच वणा नदी संवर्धन समितीचे अध्यक्ष रुपेश लाजूरकर उपस्थित होते. नगराध्यक्षा सौ. तुलसकर यांनी या अभियानाचे कौतुक करत जलसंवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा मानस व्यक्त केला.

Sant Nirankari Mission चे सचिव जोगिंदर सुखीजा यांनी सांगितले की, हा उपक्रम देशभरातील सुमारे १५०० ठिकाणी एकाच वेळी राबविण्यात आला. प्रत्येक शहर व गावाजवळील नदी, तलाव किंवा जलाशय परिसरात स्वच्छता करण्यात आली.

या उपक्रमामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे जल ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून जीवनाचा मूलाधार आहे, ही जाणीव समाजात रुजविणे. बाबा हरदेव सिंह यांच्या शिकवणुकीनुसार बाह्य आणि अंतर्गत प्रदूषण दोन्हीही घातक असल्याने बाह्य स्वच्छतेसोबत मनाची स्वच्छताही तितकीच महत्त्वाची असल्याचा संदेश देण्यात आला.

मिशनने सन २०२३ पासून भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या सहकार्याने ‘प्रोजेक्ट अमृत’ची सुरुवात केली आहे. जलसंवर्धन हा केवळ एक दिवसाचा उपक्रम न राहता तो जीवनशैलीचा भाग व्हावा, असे आवाहन करण्यात आले.

माता सुदीक्षा यांनी या अभियानाबाबत सांगितले की, येणाऱ्या पिढ्यांसाठी पृथ्वी अधिक स्वच्छ, सुंदर व संतुलित स्वरूपात जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ अभियान हा त्याच पवित्र संकल्पाचा प्रतीकात्मक उपक्रम आहे.

या स्वच्छता मोहिमेत निरंकारी मिशनचे सेवादल व संगत, स्थानिक मातोश्री महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातील विद्यार्थी तसेच शहरातील विविध मान्यवरांनी सहभाग नोंदवून अभियान यशस्वी केले.