वर्धा युथ फेस्ट २०२६ चा भव्य शुभारंभ; राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत उत्साहात प्रारंभ
नावेद पठाण मुख्य संपादक
वर्धा : वर्धा युथ फेस्टिवल समितीच्या वतीने आयोजित ‘वर्धा युथ फेस्ट २०२६’ चा भव्य शुभारंभ सोहळा सोमवार, ५ जानेवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक, वर्धा येथे अत्यंत उत्साहात व जल्लोषात पार पडला.
समस्त युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना व दुग्धाभिषेक करून या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेनुसार ढोल-ताशांच्या गजरात आणि मानाच्या मानवंदनेसह या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
या भव्य शुभारंभ सोहळ्यास वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री मा. डॉ. पंकज भोयर तसेच माजी खासदार रामदास तडस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वर्धा शहरासह जिल्ह्यातील असंख्य युवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा मान मिळवला.
यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री मा. डॉ. पंकज भोयर म्हणाले,
“वर्धा युथ फेस्टिवल हा केवळ वर्धेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांचा बुलंद आवाज बनत आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
वर्धा युथ फेस्टिवल समितीचे अध्यक्ष सारंग रघाटाटे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,
“वर्धा जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरच्या युवकालाही त्याच्या हक्काचा मंच मिळवून देणे हेच आमचे ध्येय असून, हे नाविन्यपूर्ण आयोजन दरवर्षी अधिक व्यापक आणि अधिक ताकदीने राबवले जाईल,” असे ठाम आश्वासन दिले.
हा तीन दिवसीय वर्धा युथ फेस्ट २०२६ कार्यक्रम ११, १२ व १३ फेब्रुवारी २०२६ रोजी चारखागृह, वर्धा येथे पार पडणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे विशेष नियोजन उज्ज्वल ठाकरे, प्रतीक पवार, प्रतीक्षा पवार, तेजस ठाकरे, ओम भेदूरकर, भूषण अलोने, प्रसाद मोकद्दम, फाल्गुनी आत्राम व प्राजक्ता झोड यांच्या समन्वयातून यशस्वीरीत्या साकार झाले.
युवकांचा जोश व उत्साह अधिक वाढवण्यासाठी तसेच तीन दिवसीय वर्धा युथ फेस्ट २०२६ यशस्वी करण्यासाठी वर्धेतील जास्तीत जास्त युवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वर्धा युथ फेस्टिवल समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे सुसूत्र व प्रभावी संचालन साहिल दरणे यांनी केले.