प्रश्न विचारणारी पिढी घडवणे काळाची गरज – गजेंद्र सुरकार

Wed 04-Mar-2026,01:31 AM IST -07:00
Beach Activities

प्रश्न विचारणारी पिढी घडवणे काळाची गरज – गजेंद्र सुरकार

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त लोक विद्यालयात मार्गदर्शन कार्यक्रम

प्रतिनिधि युसूफ पठाण वर्धा 

वर्धा : आजच्या शिक्षणव्यवस्था, समाज व कुटुंब व्यवस्थेत प्रश्न विचारण्याची सवय कमी होत चालली आहे. कोणी प्रश्न विचारला तर त्याला “अति शहाणा झाला का?” किंवा “आमचे केस असेच पांढरे झाले का?” अशा शब्दांत गप्प बसवले जाते. शाळेतही विद्यार्थ्यांना शांत बसण्याची सवय लावली जाते. त्यामुळे लहानपणापासूनच प्रश्न विचारण्याची वृत्ती दडपली जाते. यामुळे वैज्ञानिकांची संख्या कमी होत असून अंधश्रद्धेला खतपाणी मिळत आहे. प्रश्न विचारणारी आणि चिकित्सक दृष्टिकोन असलेली पिढी घडवणे ही संविधानिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी केले.

२८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त लोक विद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ. सुषमा कोटेवार उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना सुरकार म्हणाले की, अनेक शोध हे प्रश्न पडल्यामुळेच लागले आणि त्यामुळे मानवाचे जीवन सुसह्य झाले. मात्र धर्माचे प्राबल्य वाढल्याने दैववादी प्रवृत्ती बळावली आहे. भारताचे शास्त्रज्ञ C. V. Raman यांना नोबेल पारितोषिक मिळाले; परंतु त्यानंतर भारतात राहून संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाला नोबेल मिळाले नाही, ही बाब चिंताजनक आहे. दैववादाचा प्रभाव वाढल्याने प्रयत्नवादापासून दूर जाण्याची प्रवृत्ती वाढते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, चिकित्सक विचारसरणी विकसित करणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, समितीच्या वतीने दि. २५ रोजी विद्यार्थ्यांसाठी ‘चमत्कार प्रशिक्षण शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात लोक विद्यालयातील विद्यार्थिनींनी सहभाग घेत विविध वैज्ञानिक प्रयोग सादर केले. त्यांनी प्रयोगांमागील कार्यकारणभाव स्पष्ट करत तथाकथित चमत्कारामागील हातचलाखी, फसवणूक व वस्तूंमध्ये केलेले बदल यांचे प्रात्यक्षिक दाखवून दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. सुषमा कोटेवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.